कारण चरित्र लिहायचें आहे !
'' चरित्र काय पुढच्या अंकांत देणार आहांत का ? - छान बाळाभाऊ म्हणजे नामांकितच लेखक ! अहो वा ! त्याचा माझा स्नेह लहानपणापासूनचा ! - लंगोटीमित्रच आम्ही ! त्यामुळें हवी तितकी माहिती मला देतां येईल ! - हां, तेवढें मात्र विचारुं नका ! लेखनांत काय त्यानें तेज दाखविलें असेल तेंच ! बाकी मनुष्य आपला - तुमच्या आमच्यांतल्या गोष्टी या - मनुष्य आपला असा तसाच ! - अहो स्वभाव काय, अन् वर्तन काय ! गोंधळ ! काय सांगायचें तुम्हांला ? सरळपणा म्हणून यत्किंचित् नाहीं ! कधीं कोणाचे पैसे घेतले, आणि ते बोवा परत केले आहेत, नांव नाहीं ! याचे घे, त्याचें घे असें करुन सातआठ हजारांला तरी त्यानें बुडविलें असेल ! शिवाय लोकांची पुस्तकें दाबली ती वेगळीच ! हा जिथें साधा व्यवहार, तिथें काय बोलायचें आणखी ! हीच तर्हा व्यसनाची ! अहो, परवां मरायच्या आधीं महिना दोन महिन्यांतली गोष्ट ! दिवसाढवळ्या, अगदी भर चौकांत एक टांगेवाल्याशीं मारामारी केली ! बोला आतां ! - अहो, कसचें कारण अन् काय ! यथास्थित झोकली होती झालें ! - नीट नोकरी नाहीं, धंदा नाहीं, सदा चहा आणि विडया ! रोज उठून घरांत भांडणें ! - कां नाही व्हायची ! वेळ नाहीं, अवेळ नाहीं, येईल त्याच्या नरड्यांत चहा ओतायचा ! कांही त्याला सुमार ? - आपलें बोलायचें किंवा लिहायचें नाही इतकेंच ! बाकी अशा एक एक गोष्टी आहेत कीं, - चांगलें बाबांचें लग्न करुन दिलें, पण घटकाभर पटेल तर शपथ ! कारण बाहेर यांचा रोमान्स बोकाळलेला ! शेवटीं एक दिवस नवराबायकोची अशी जुंपली कीं काहीं पुसूं नका ! - झालें ! पुढें काय ? ती उठून बापाच्या घरी चालती झाली, आणि हें काय ? - यांची उप्पर मिशी ! कारण, '' गेली, तर गेली ! नाकावर टिच्चून दुसरें लग्न करीन मी ! '' - आणि ठणठणीत केलें लग्न ! तेव्हां अशा या भानगडी, पण लिहून थोडेंच चालतें आहे ? तिथें म्हणजे, ' यांना दोन बायका होत्या ही गोष्ट खरी. पण पहिलीला मूल होईना, तेव्हां ती सारखी झुरणीस लागली ! इतकी कीं, शेवटीं तिनें अंथरुण यांनीं दुसरें लग्न करावें ! शेवटीं अगदीं निरुपायानें - कारण लग्न केलें ! ' - म्हणजे अशा तर्हेनें सगळें फिरवून - कारण चरित्र लिहायचें आहे, तेव्हां तें - ''
३ मार्च १९१३