तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी
'' .... या आळीला का ? ' ख्राइस्ट लेन ' असें म्हणतात. त्या समोरच दिसणार्या खांबाच्या कपाळावर काळ्या अक्षरांनीं लिहिलेली पाटी ठोकलेली आहे, तिकडे आपण पाहिलेंच नाहीं वाटतें ? - ते पहा, अजून रक्ताचे डाग आहेत त्या खांबावर ! फळीवरही थोडेसे शिंतोडे उडालेच आहेत. - अहो, परवां रात्रीचीच गोष्ट. दारुबाज नवर्यानें घराबाहेर हाकून दिलें म्हणून ज्या बिचारीनें - किती गरीब आणि सद्गुणी होती ती ! - रागाच्या आवेशांत त्याच, त्याच, खांबावर आपलें कपाळ फोडून जीव दिला, त्याच बाईच्या आत्म्यानें जातां जातां ' ख्राइस्ट ' या अक्षरांवर ते रक्ताचे शिंतोडे उडविले आहेत ! - हें झालें ? तसेंच एकदां त्या खांबाजवळ एक मूल - अरेरे ! त्या अर्मकाच्या नरड्याला व छातीला पांच, पंचवीस खिळे ठोकलेले ! - असें तें मूल, कोणीं चांडाळानें आणून टाकलें होतें ! - जाऊं द्या कीं ! आपल्याला काय करायचें आहे या गोष्टीशी म्हणा ! - काय चिरुट ? कोणत्या छापाचा आहे ? वेलिंग्टन चिरुट असेल, तर मग हरकत - नाहीं ! अहो परवां काय झालें ! जवळच इमर्सन चौकांत विस्मार्क कंपनीचें दुकान आहे - तेथें मीं जवळजवळ दोन शिलिंगाचे पैगंबर छापाचे चिरुट, जो तो त्यांची स्तुति करायला लागला, म्हणून मोठ्या हौसेनें विकत घेतले ! - झालें ! थोड्या वेळानें मी जो त्यांतला एक ओढून पाहातों तों काय ! सारखा अर्धा तास ठसका ! - असा कांहीं संताप आला कीं, ते सगळे चिरुट घेतले, अन् लागलीच शेजारच्या गटारांत फेंकून दिले ! - नांवें मात्र मोठमोठ्यांचीं, पण येथून तेथून बदमाषगिरी ! - अरे वा ! तुमचा नेपोलियन शू बराच टिकला आहे कीं ! - मी तुम्हांला सांगत नव्हतों कीं तो सॉक्रेटिस बूट घेऊं नका म्हणून ? असो. आपण आमच्या देशामध्यें, माझ्या घरीं पाहुणचार घेत कांहीं दिवस तरी राहिलेंच पाहिजे. पहिल्यानेंच येथें आलां आहांत - तो पहा ! आमच्या वाइजमनच्या बहिरी ससाण्यानें कसा पक्षी धरुन आणला आहे ! - मोठा चलाख आहे ! जवळजवळ रोज तीसपासून पस्तीसपर्यत पांखरें धरुन आणतो ! त्याचें नांव काय ठेवलें आहे ठाऊक आहे का ? - शेक्सपीअर ? - कारण तो म्हणतो कीं, जसा कविराज शेक्सपीअर, माणसाच्या अंतःकरणांत अगदीं सांदीकोपर्यांत दडून बसलेले विचार पकडून आणण्यांत मोठा हुशार होता, तस्सा माझा हा ससाणा पांखरें धरुन आणण्यांत मोठा वस्ताद आहे ! हः हः हः का ? आहे कीं नाहीं ! .... ''
१७ नोव्हेंबर १९११