Get it on Google Play
Download on the App Store

चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच

'' ..... काळी आहें का म्हणावें मी ? कशी गोरी गोरीपान आहें ! - हो हो ! आतां आमच्या चिंगीला सरी करायची, बिंदल्या करायच्या, झालंच तर बाळे, साखळ्या, सगळे सगळे दागिने करायचे ते ! - कसा छानदार मग परकर नेसायचा, पोलकें घालायचें, अन् ठुमकत शाळेंत जायचें, नाहीं बाई ? - शहाणी होईल बबी माझी ! मोठीं मोठीं बुकं वाचील ! अन् मग महाराज छोनीचं आमच्या लगीन ! - खरचं सोने, तुला नवरा काळा हवा, कीं गोरा ? - का..... ळा ! - नकोग बाई ! छबीला माझ्या कसा नक्षत्रासारखा, अगदी चित्रासारखा नवरा मिळेल हो ! - अस्से थाटाचें लगीन करीन, कीं ज्याचें नांव तें ! आहात कुठें ! हजार रुपये हुंडा देईन, हजार ! ताशे, वाजंत्री, चौघडा - हो हो तर ! बेंडबाजासुद्धां लावायचा ! वरात पण वरात निघेल म्हणावें ! नळे, चंद्रज्योती, झाडें यांचा काय लकलकाट होईल ! - पण खरेंच गडे चिंगे, तूं मग भांडायसवरायची नाहींस ना ? जर का घरांत भांडलीच, तर पहा मग ! माणसाला कसं मुठींत ठेवायला हवें बरं का ! संसार पण संसार झाला पाहिजे ! आणि हें बघ, आपलें आधींच सांगून ठेवतें, पहिलें तुझें बाळंतपण कीं नाहीं, इथें व्हायला हवें ! पुढची करा हवीं तर खुशाल आपल्या घरी ! - मोठी दैवाची होईल चिंगी माझी ! पुष्कळ मुलं होतील माझ्या बबीला !! - पण काय ग, तुला मुलं झालेली आवडतील, का मुली ? मुली ! - नको ग बाई, कारट्यांचा मेला तो जंजाळ ! एकापेक्षां एक, असे सगळे मुलगे होतील म्हणावें, मुलगे ! - तसेंच, गाडी - घोडे, कपडालत्ता, कश्शा कश्शाला म्हणून कांही कभी पडायचं नाहीं ! - बरं बरं ! इतक्यांत नको कांहीं चढून जायला ! मोठा दिमाख दाखवते आहे मला ! - पहा, पहा ! फुगते आहे पहा कशी ! - पण कार्टे, बोलूं तर नकोस माझ्याशीं कीं अस्सा हा गालगुच्चा .... अग बाई ! .... हें ग काय ! कसें सोन्यासारखें बोलतें आहें, अन् तुं आपली .... नाय .... नाय .... उगी, उगी माझी बाय ती .... ''

२ जानेवारी १९१२

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?