ओझ्याखाली बैल मेला !
'' .... ओ ! आग लागो त्या महत्त्वाकांक्षेला ! आणि त्यांत तळमळणार्या, तडफडणार्या या जीविताला ! - अरे हा गळफांस काढा - खुंटी नरड्यांत शिरली ! जूं दूर करा - मी मेलों ! - या बैलानें, चांडाळानें छळून किं हो शेवटी मला असें मारलें ! - नको ! ही यातनांची तीव्र ओढाताण ! देवा ! सोडीव आतां लवकर ! आयुष्याचा डोलारा कोसळला ! सोसाट्याच्या झंझावातांत जग गिरक्या घेऊं लागलें ? - विक्राळ अंधकारानें झडप घातली ! जीवा ! जिभेचा अडसर बाजूला काढ, - पहातोस काय ! - कानावर लाथ मारुन, नाही तर डोळे फोडून बाहेर नीघ लवकर ! हा ! नरकांतल्या धडधड पेटलेल्या आगींत अनंत काल उभें राहणें पुरवलें, - पण अंगांत शक्ति नसूनही, मोहक, कामुक अशा महत्त्वाकांक्षेच्या पुरें नादी लागून, कर्रर - कर्रर ओरडून रक्त ओकणार्या हाडांच्या सांपळ्यावर प्रचंड ओझीं लादून, तोंडाबाहेर दुःखांनी चघळून चघळून, जिवाचा फेंस काढीत, फरकटत ओढीत नेणारें, देवा ! हें जगांतलें बैलाचे जिणें नको ! अरे मूर्खा, अजागळा, रोडक्या बैला ! ' माझ्या इतर सशक्त सोबत्यांप्रमाणे मी आपल्या मानेवर मोठमोठी ओझीं घेऊन डौलाने, गर्वानें छाती फुगवून - जगांत कां मिरवूं नये ? ' असें पुनः एकदां वर मान करुन मला विचार पाहूं ? आ वासून रस्त्यांत धूळ चाटीत, मरणाशीं ओढाताण करीत कारे बाबा असा लोळत आहेस ? - हाय ! असा हंबरडा फोडून रडूं नकोस ! माझी चूक झाली - राग मानूं नकोस ! ये, मला एकदां कडकडून शेवटची मिठी मारुं दे । मग मी आनंदानें जाईन बरें ?.... ''
१० फेब्रुवारी १९१२