पण बॅट् नाहीं !
'' .... चक्क खोटा डिसिजन् ! कॅच असेल कोठून ? बॅटला बॉलच जर मुळीं लागला नाहीं तर - दुसरें काय ! वुइकिटकीपरनें विचारलें, अंपायरनें ' हो ' म्हटले. मामा लेकाचा ! - किती बेचाळीसच ना ? - उं: ! कांहीं फार झाल्या नाहींत ! - अरे चांगला सेट् झालों होतों, सहज सेंचरी निघाली असती ! - हुश्श ! बॉय ! सोडा लाव ! छे बोवा ! आज फारच थकलों ! छान म्हणजे ? राव बिजली आहे बिजली ! गन् अँड् मूरचा आटोग्राफ आहे ! बॅट् हलकीसलकी नाहीं ! पैसेच तसे मोजले आहेत ! - अरे तिचें आधीं केनच किती कॉस्टली आहे ! अन् खेळायला काय ! अगदीं फुलासारखी ! इतकें त्या - तो इकडचा बोलर नाहीं ? - इतकें त्याचें बोलिंग मारलें ना ! पण हाताला हूं की चूं नाहीं ! - कटिंगला तर बोलायलाच नको ! नुसती टाकायचा अवकाश, कीं ऐसा बॉल जातो आहे ! नुसते पहात रहावें ! बॅट म्हणजे दिलजान् आहे ! हजार पांचशेंतून निवडून काढली आहे ! उगीच नाहीं ! - पहा ! आहे ? अगदीं त्रिफळा उडाला ! लाख वेळां सांगितलें कीं, बॅकवर्ड खेळूं नको म्हणून ! आले आतां हाका मारीत ! नेक्सट कोण भिडे जातो आहे ना ? - जपूज खेळ रे बोवा - लेगब्रेक आहे ! जरा संभाळून ! नाहीं तर होशील बबड्याजीराव ? - काय ? बॅट् ? माझी बॅट् देऊं तुला ? हात जोडतों ! भाई माफ कर ! तेवढें नाहीं व्हायचें । दुसरें काय हव्वें तें - अगदी माझ्या जिवाचें माणूस - स्वतःचा जीव मागितलास तरी देईन ! पण बॅट् नाहीं हो !.... ''
८ ऑगस्ट १९१३