Get it on Google Play
Download on the App Store

पंत मेले - राव चढले

[ पंतांच्या घरीं ]

''.... असें काय ? सोड मला ! चिमणे, असें वेडयासारखें काय करावें ! रडतेस काय ? जा ! दार लावून घे - घरांत आपला गोपूबाळ निजला आहे ना ? त्याच्याजवळ जाऊन बैस हं ! रडूं नकोस, जा ! - आई आबासाहेबांकडे भात सडायला गेली आहे, ती आतां इतक्यांत परत येईल ! जाऊं मी ? रडायची नाहींस ना ? भूक लागली आहे म्हणून का तूं रडतेस ? - असें काय ? चिमे, मी येईपर्यंत तूं अगदी गप रहा हो ! - आईनें दळून ठेवलेलें हें पीठ यमुनाबाईच्या घरीं पोंचवितों, आणि तसाच माधुकरी मागून मी लवकरच परत येतों ! मग माझ्या ताईला भात, वरण, भाकरी - माधुकरी म्हणजे काय ? ताई ! माधुकरी मागणें म्हणजे भीक मागणें हो ! - लोक आपल्याला भिकारी म्हणतील ? म्हणूं दे ! बाबा देवाच्या घरीं गेले आहेत; त्यांनी देवाला सांगितलें म्हणजे मग देव आपल्याला श्रीमंत करील ! - बाबा केव्हां येतील ? छे ! ते आतां कुठलें यायला ! हें बघ ताई ! तूं बाबांच्याबद्दल पुनः कधीं आईला विचारुं नकोस हो ! ती किं नाहीं लागलीच रडायला लागते ! कोण आई ! केव्हां आलीस ? हें ग काय ! - आई ! आई !! कां ग अशी एकदम मोठमोठ्यानें रडायला लागलीस ? मी माधुकरी मागायला जातों म्हणून ? होय ? - पण आई ! तूं नाहीं का ग लोकांची भांडी घांशीत - दळण दळीत - धुणें धुवीत ? तसेंच मी - आई ! गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको जाऊं म्हणतेस ? कां बरें ? ऊन फार पडलें आहे, आणि माझे पाय फार पोळतील म्हणून ? असूं दे कीं ! मी पळत पळत जाऊन लवकर परत येतों ! जर आतां मी गेलों नाहीं तर गोपू, चिमी, तूं, मी, सगळे जण आपण भूक लागून रडायला नाहीं कां लागणार ? मग आपल्याला कोण बरें खाऊं घालील ? आई ! मी आत्तां जाऊन येतों, सोड मला !.... ''

[ रावांच्या घरीं ]

''.... खाऊ ! अरे पेढे आणले आहेत पेढे ! थांबा, थांबा ! अशी घाई करुं नका ! सगळ्यांना देतों बरें मी ! आधीं देवाला नैवेद्य दाखवूं ! आणि मग - हो, हो ! तुला आधीं देईन सोने मी ! मग तर झालें ! - पाणी आणलेंस ? शाबास ! हं, सोने, बापू, देवाच्या पायां पडा, आणि म्हणा ' जय देवबाप्पा ! असेच सुखाचे दिवस आम्हांला वरचेवर दाखवीत जा !' - अस्सें ! शाबास ! हं, हे घे सोने, तुला चार, आणि हे बापू, तुला चार, झालें ना आतां ? - कोण आहे ? रामभाऊ ? अरे वाः ! तुम्ही तर अगदीं वेळेवर आलांत बुवा ! हं, हे घ्या, - आधी खा मुकाट्यानें ! मग कारण विचारा ! मला पांच रुपये प्रमोशन झालें पगार वाढला, त्याचे हे पेढे ! समजलें ? अरे बापू ! आतां हे आंत घेऊन जा ! आणि इकडे बघ, आपल्या त्या गोविंदरावांना, आपासाहेब कर्व्याना, झालेंच तर माडीवरच्यांना, सगळ्यांचा घरी आतांच्या आतां जाऊं द्या म्हणावे ! समजलें ना ? नको, नको, मला नको ! अहो हपिसांत मीं पुष्कल खाल्ले आहेत ! - मंडळी ऐकेचनात ! तीन रुपयांचे पेढे द्यावे लागले मला ! - म्हटलें जाऊं द्या ! मंडळी आपली आहेत ? आणि पुनः असे आनंदाचे प्रसंग वरचेवर थोडेच येत आहेत ? - बरें झालें चला ! इतके दिवस आशेनें रात्रंदिवस वाट पाह्यल्याचें परमेश्वरानें शेवटीं सार्थक केलें ! अहो, पंधराचे वीस व्हायला सहा वर्षे लागली - सहा वर्षे ! नुकतेच आमचे दिवाकरपंत मेले, आणि त्यांची ही जागा मला मिळाली, बरें ! - असो, ईश्वराची कृपा होती म्हणून हे तरी दिवस दिसले ! हो ! करतां काय ? - बरें आपण आतां मुंबईला कधी जाणार ? - रविवारची ना ? मग हरकत नाहीं ! कारण मी परवांच्या दिवशीं श्रीसत्यनारायणाची पूजा करण्याचें योजले आहे ! तेव्हं म्हणतो, प्रसाद घेऊन मुंबईला जा ! - ठीक आहे ! अहो, परमेश्वरांची कृपा असली तर उत्तरोत्तर आपल्याला आणखीही असेच सुखाचे दिवस येतील ! काय ? म्हणतो तें खरें आहे कीं नाहीं ?.... ''

१७ मे १९१२

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?