दिव्याभोंवती पतंग उडत आहेत
''.... काय म्हटलेंस ? आपल्या जीविताचा तुला कंटाळा आहे ? - हे बघ, हे बघ, या दिव्याभोंवती कसे पतंग उडत आहेत - कसे पण प्रेमानें अगदी तर्रर्र होऊन भोंवतलच्या जिनसांवर तडातड उड्या मारीत आहेत ! हा पहा, या लहानशा पुस्तकावर कसा सारखा धिरट्या घालीत आहे ! - प्रेमशोधनच आहे हं ! - अग नको, नको, त्याला हात नको लावूंस ! - बाबांनो, या दिव्याच्या ज्योतीला खुशाल आनंदानें प्रदक्षिणा घाला ! - काय पहा ! त्या ज्योतीच्या लाटांमध्ये पोहण्यासाठीं, बिचारे चिमणीवर कसे धडक्यावर धडक्या घेत आहेत ! - कशाला ! - अंतः करणातील प्रेमाची प्रखरता, प्रकाशाच्या - ईश्वरी प्रेमाच्या - प्रखरतेमध्यें मिसळा - यला ! - तें ज्योतीमध्यें बुडून गेलेलें दीपगृह आहे ना ? - अग तें अंगुस्तानासारखें दिसत आहे तें ? - तेथें जायचें आहे त्यांना ! अरेरे ! बिचारे पहा कसे मरुन पडले आहेत ते !! धडपड, धडपड केली खरी, त्यासारखें, यांच्या आत्म्यांना तर तें दीपगृह मिळालें ! - त्या लहानशा ठिकाणीं कितीतरी जोडपीं आनंदानें, प्रेमानें नांदत असतील नाहीं ! - आपल्या या अफाट जगांत सारखा कलह सुरु आहे ! पण तोंच त्या चिमुकल्या स्वर्गातून, कलहाचा एक तरी - अगदीं लहानसा तरी - सुस्कारा आपल्याला ऐकूं येत आहे का ! खरेंच ! या पतंगांचें जीवित कितांतरी सुखाचें, प्रेमाचें आहे ! आपलेंही - ! .... ''
१० नोव्हेंबर १९११