झूट आहे सब् !
'' .... किती ? - बारा वाजले ! - हेः ! भलताच उशीर झाला आपल्याला ! वाद करायला बसलें, कीं वेळेचं भानच राहत नाहीं बोवा ! - अरे असें काय ! चार कोळसे टाक आणखी बंबांत कीं आतां - हां हां म्हणतां - पाणी तापेल ! उगीच वेळ गेला झालं ! बरं, इतका काथ्याकूट करुन निष्पन्न कांहींच नाहीं ! - ओ हो ! काय ठिणग्या उडाल्या रे या ! ती पहा ! किती उं.... च उडाली आहे ! - पण आ .... लीच शेवटी खालीं ! - लहानपणीं विझली काय, किंवा मोठेपणीं - उंच जाऊन विझली काय, दशा शेवटीं एकच ! - म्हणजे फरक जगली किती हाच काय तो ! एकदां ठिणगी विझली .... लक्षांत आलं का ?.... प्राणी मेला, कीं संपलं सगळं ! - हो हो, सगळं संपलं ! - नाहीं रे बोवा ! कांहीं पुनर्जन्म नाहीं, अन् कांही नाही ! - असतं तसं कांहीं, तर तुझा तो शेक्सपीअर नसता कां आला पुन्हा ? चक्क येऊन सांगितलं असतं कीं, ' हीं नाटकं माझीं आहेत, मीं लिहिलेलीं आहेत ! कांहीं कुणा बेकनचा अन् फिकनचा संबंध नाहीं ! ' कशीं छान सुंदर नाटकें ! आणि तीही कांहीं थोडीथोडकी नाहींत ! ' सोडील होय कोणी ? - पण पत्ताच जिथं नाही त्याचा, तेव्हां तो पुन्हा येतो कशाचा अन् जातो कशाचा ! - हो हो, आहे ना स्वर्गात ! जा, आणा जाऊन मग ! - ठेवला आहे, स्वर्ग अन् नरक ! थोतांडं सगळी ! - अरे कुठला घेऊन बसला आहेस आत्मा ! - काय, आहे तरी काय तो ? - वारा ? का प्रकाश ? - हां, वार्यामध्यें किंवा प्रकाशांत मिसळणें, हें जर तुमचें स्वर्गानरकाला जाणं असेल, तर मात्र कबूल ! कारण मग राजश्री मनोविकार कुठले आले आहेत तिथं ! - तें कांही नाहीं ! तुमचा तो आत्मा कीं नाहीं, देहांत आहे तोंवरच त्याची प्रतिष्ठा ! - हो मग ? नाहीं कुठं म्हणतों आहें मी ! देहाचंही तेंच आहे ! दोघं जोंपर्यंत एकत्र तोंपर्यत ती एकमेक जिवंत ! - मेलं कीं दोन्हीही गेली पार ! मागमूस नाही कुठं मग ! - तेंच तर बाबा म्हणतों आहें मी, कीं जेवढे म्हणून प्राणी जन्माला येतात ते सगळे इथून तिथून नवीन ! आणि शेवटही त्यांचा .... ! बरं का ? शेवटही पुन्हा सगळ्यांचा एकच ! - मग पाप करा, नाहींतर पुण्य करा ! - स्वर्ग, नरक आणि तुझा तो पुनर्जन्म, सगळें - सब कांहीं झूट आहे ! .... ''
२७ मे १९१२