निःशब्द आत्मयज्ञ
कधीं भेटतां एकांतीं ती नाहिं कुणा दिसली,
कधीं बोलतं परस्परांशीं नाहीं पाहियली
दृष्टादृष्टहि परस्परांची जरी कधीं झाली,
कधीं न लवलें पातें, न कधीं छटा दिसे गालीं.
कधीं निमंत्रित भोजनास तो घरीं जरी आला
हर्शविषाद न कधीं तिच्या तो शिवला चित्ताला.
गौर मनोरम रूप तयाचें, लाजावें मदनें;
मोहित सारे, परि न बघे ती एकवार नयनें.
तो दीनांचा कनवाळू जैं भरोनिया डोळे
"या विधवांवरि दया करा हो !" कळवळुनी बोले
कानोसा घेतांना भासे एक दिवस बसली,
परि पाहुनि मज शांतपणें ती निघोनिया गेली.
कंपित हस्तें लेंख लिहित ती नाहीं कधिं दिसली,
वेळिं अवेळीं वळचणींतुनी नाहिं पुडी पडली.
तरी सकाळीं एक दिवस मज तिच्या अंगुलीला,
डाग दिसे शाईचा; कागद तुकडे झालेला,
त्याच अंगुलीवरी परि दिसे फोडहि आलेला,
कधीं पोळलें बोट कशानें ठाउक देवाला !
अंथरुणावरि कधि रात्रीं नच दिसली बसलेली,
तरी कधिंकधी उशी तियेची दिसली भिजलेली.
कोंदण हरपे, दीन हिरकणी कोपर्यांत लोळे,
असें वाटलें मज दगडा कधिं बघुनि तिचे डोळे.
ती चंद्राची कोर, जिला हो लाजावें रतिनें,
कळाहीन लागली दिसाया हाय काळगतिनें !
हळूहळू ती गळूं लागली, गाल खोल गेले,
ज्वरें जीर्ण त्या कोमल ह्रदयीं ठाणें बसवीलें.
किती वेळ तो समाचारही घ्यायाला आला,
नयनीं त्याच्या काळजिचा कधिं भास मला झाला.
डाक्तर झाले, हकीम झाले, वैद्यहि ते झाले,
निदान होय न कुणा, कुणाची मात्रा नच चाले.
"दीनदयाळा मरणा, सोडिव !" जपोनि जप हाय !
कारुण्याची मूर्ति मावळे, थिजला तो काय !
अकस्मात त्या क्षणापासुनी अदृश्य तो झाला,
कोठे गेला, काय जाहलें, ठाउक देवाला !