दुष्काळानंतरचा सुकाळ
घुमव घुमव एकदा फिरुनि तो गोड तुझा पांवा,
सोनें झालें शेत पिकुनि हें, करितें मी धावा.
लख्ख पसरलें शेतावर या निर्मळ बघ ऊन,
पसर तसा तूं जादु तुझाही पांवा फुंकून.
त्या जादूनें वनदेवीची भूमि बने शेत,
कीं स्वर्गचि तो ओढुनि आणी क्षणामधें येथ !
मोत्यांचे दाणे हे भरले कणसांत या रे सख्या,
लवलीं हीं कालीं कितितरि भारें तया रे सख्या,
आनंदें डुलतिल पांवा परिसोनिया रे सख्या,
होति विलक्षण वृत्ति मनाच्या, भुलति दुष्टभावा,
फुंकार्यासह जाति उडोनि क्रोध, लोभ, हेवा. १
डुलुनी धुंदिंत बैल डुकार्या करिती कुरणांत,
बागडती या गाइ सख्या रे, हंबरडे देत.
शिंगें ताडुनि शिंगांवरती देती ताल म्हशी,
सळसळती ही कणसें पवनीं खळखळते नदि जशी.
पंचमांत गाते झाडावरि कोकिळा रे सख्या,
नाचोनि मोर हा उंच ओतितो गळा रे सख्या,
हा ओढा गाउनि खळखळ भरतो मळा रे सख्या,
लोट लोट रे ओघ जादुचा पांव्यांतुनि तेव्हां,
सकळ मिळोनी एक सुरानें गाउं देवरावा. २
कनवाळू तो या गरिबांचा कळवळला देव,
दूर पळाला काळ, घातला खोल जरी घाव.
धरणीमाता प्रसन्न झाली, कणसें हीं पिकलीं;
हाय ! कशी मीं तुकड्याकारण 'बइ' माझी विकली ?
हीं बाळें आतां दूर नको व्हायला रे सख्या,
जाशील न टाकुनि तूंही आतां मला रे सख्या,
तें अभक्ष्य नलगे पोटा जाळायला रे सख्या,
स्मरण नको तें ! पुन्हा स्फुरण हो आठवतां घावा;
भुलवाया तें दुःख जिवाला पांवा हा ठावा. ३