मार्गप्रतीक्षा
कृष्ण वस्त्र हें भयद घेउनी
अखिल विश्वही त्यांत झाकुनी,
रमणिसंगमा ह्रदयिं उत्सुक
जाइ अष्टमीकुमुदनायक
रजनि पाततां सदनिं धावती,
मजविना तईं पळ न राहती,
तरिहि यावया आज यांजला
उशिर कां बरें फार लागला ?
कपट साधुनी राजशासनीं
फसविलें कुणीं वैर साधुनी ?
यांवरी धरी शस्त्र का अरी ?
काय जाउं मी पाहण्या तरी ?
भुरळ घालुनी यांजला कुणी
छळि समंध का नेउनी वनीं ?
मंत्र घालुनी घोर यांवरी
पशु-पतत्रि का यां कुणी करी ?
काळसर्प यां-परि नको नको !
अगइ ! कल्पना भयद या नको !
मम विदीर्ण हें होइ काळिज,
हुडहुडी भरे भीतिनें मज.
कडिवरी कडी चढविली किती,
बुडविला जळामाजि गणपती;
राहुनी उभी दारिं पाहतें
वाट मी जरी भीति वाटते.
पाळण्यामधें बाळ सोनुलें
एकटें असे आंत झोपलें;
त्यास पाहु का आंत जाउनी ?
वाट पाहुं का येथ राहुनी ?
दूर ऐकुनी कांहिं चाहुल
वाजतें गमे काय पाउल ?
म्हणुनि पाहिलें नीट मी जरी
दिसति ना, करूं काय मी तरी ?
बाह्य वस्तु या शांत भासती,
चित्त अंतरीं क्षोभले किती ?
अखिल विश्व हें झोप घे जरी
चैन या नसे अंतरीं तरी.
धनिक सुंदरी रम्य मंदिरीं
मंचकावरी मुदित अंतरीं,
कृषकयोषिता काम सारुनी,
निजति तान्हुलें जवळ घेउनी.
तरुशिरावरि अखिल पक्षिणी
स्वस्थ घोरती फार भागुनी;
धन्य धन्य या पुण्यवंत कीं !
तळमळेंच मी एक पातकी.
विझवुनी दिवाही नभोंगणी
सुप्ति सेविली सर्व सुरगणीं,
तरि दिसेल तो मार्ग केवि यां
गहन या तमीं सदनिं यावया ?
फिरफिरूनिया भयद कल्पना
टाळितें तरी जाळिती मना;
काव काव कां करुनि कावळे
भिवविती मला आज ना कळे.
समयिं रात्रिच्या शकुनिशब्द ते
अशुभ मानिती म्हणुनि मी भितें.
आइ अंबिके, असति ते जिथे
पाळ त्यां तिथे हेंच विनवितें.
तुजवरी अतां भार टाकितें,
तुजविना अम्हां कोण राखिते ?
तूंच धावशी विनतपालना,
तुजविना रिघूं शरण मी कुणा ?
आण त्यां घरीं तूं सुरक्षित,
पाळ आइ, तूं आपुलें व्रत;
त्यांस आणण्या तुज असे बळ,
वाहिं मी तुला चोळीनारळ.