विधवेचें स्वप्न
"सखे अगे, ऊठ ! रवी उदेला
झोपेंत तूं हासशि गे कशाला ?
गे ऊठ, गे ऊठ ! बहूत होई
गंगेस जाण्यास उशीर बाई."
"गेली कुठे ती सरिता, कुठे ती
उद्यानशोभा, नवचंद्रकांतीं ?
गेले कुठे प्राणचि सौख्यदाते
नेल्याविना हाय अगाइ ! मातें ?
कीं काय तें स्वप्नचि सर्व होतें ?
हो स्वप्नची; मी निजतें पुन्हां तें
पडो, मला तें सुख देइ फार,
वाटे मला जागृति ही असार !
स्वप्नीं तरी हो सहवास कांता,
सदा घडो हीच विनंति आतां;
कोठोनिया हो सुख जागृतीं तें
लाभेल दुर्भाग्यवतीस मातें ?
भेटा मला, मी निजतें पुन्हां या
कां गे सखे, जागवितेस वाया ?
ही नीजतें मी न पुन्हा उठेन
स्वप्नींच त्या सौख्यभरें असेन."
'गडे, भ्रमिष्टासम आज कां गे
तूं बोलशी यापरि नीट सांगे,
झोपेंत कां गे वद हासलीस,
झालें असें काय तुझ्या मनास ?'
"स्वप्नांत उद्यान, नदी विशाला,
ज्योत्सना सुरम्या, बघतां प्रियाला
तेथें तृषार्ती नयनीं पिऊनी
आनंद होतां हसलें. तयांनीं-"
"रडूं नको सांग सखे पुढें तें"
"बोलाविलें खूण करोनि हातें !
ही नीजतें मी न पुन्हा उथेन,
स्वप्नींच त्या सौख्यभरें असेन."