आनंदी आनंद !
आनंदी आनंद मुलांनो, आनंदी आनंद !
चहूंकडे दशदिशीं दाटला आनंदी आनंद ! ध्रु०
आकाशी आनंद वरी
भरे धरेवरि त्याचपरी,
गिरिशिखरी, तरुशिखरिं, घरीं
आनंदाचा सागर भरला घ्याच बुड्या स्वच्छंद. १
फुलावरुनिया फुलावरि सुखें फुलपांखरुं ज्यापरी झुले,
तसें झुलाया तुम्हां उधळिलीं प्रभुजीनें चहुंबाजु फुलें.
म्हणुनी उडतां बागडतां,
गरगरगर मंडळ धरितां,
सलील हासत गुणगुणतं.
वस्तुमात्र आनंद दे, तुम्हां काय जगाचे फंद ? २
झुळझुळ मंजुळ गातो निर्मळ झरा, युद्ध जुंपो तीरीं,
पर्वा त्याची काय झर्याला ? जीवन तुमचें त्याचपरी.
घडामोड चाले जगतीं,
किति हसती, किति आरडती,
काय तुम्हां त्याची गणती ?
तुम्हि तुमचा आनंद अहाहा ! आनंदांतचि धुंद ! ३
किति धडपडतों अम्ही कीं मिळो आनंदाचा लेश तरी,
तर्हा तर्हा किति करितो परि तो फसवि अम्हां मृगजळापरी.
अग्निरथीं त्याला बघतों,
शोधित तारांमधिं फिरतों,
व्याप हाच त्या दडपीतो,
दिशाभूल हो अमुची, न मिळे आनंदाचा गंध. ४
पापशून्य, अति निर्मळ ह्रदयीं आनंदाला वास रुचे,
मंदिर सुंदर आनंदाचें ह्रदय म्हणोनिच तें तुमचें.
खोटी लज्जा, राग तसें
खोटें रडणें आणि हंसें-
काय तुम्हां हें सर्व पिसें ?
आनंदति किति डोळे अमुचे बघतां तुमचे वृंद ! ५
गोड चिमुकल्या छबिल्यांनो, या अखंड आनंदांत वसा,
गमावुनि उगिच बेगडी मुलाम्यास नच कधीं फसा,
आनंदाचें दास्य करा,
बळकट त्याची कास धरा,
मग न तयाला वाण जरा,
सकल मनोरथ पुरवो तुमचे आनंदाचा कंद ! ६