ती रम्या जननी
चंद्रानें गगना पयोधवलशा वाटे रसें व्यापिलें,
कांतेनें पहिल्या रसेंचि ह्रदया या टाकिलें व्यापुनी;
नक्षत्रें गगनीं वरी तळपती रत्नें जुईचीं फुले-
तेजःपुंज विचार शीतल मृदू या द्योतती मन्मनीं.
ऐशा रम्यमयीं प्रमोदसमयीं सौधावरी मंचकीं
बाहू घालुनि बाहुमाजि बसलों दोघें अम्ही एकदा,
नेत्रीं प्रेममयीं विलोकुनि बहू आलिंगुनी तैं सखी
बोलें मी, "प्रिय वल्लभे, ह्रदय तूं, तूं जीव, तूं संपदा !
माळा घालुनि बाहुंची मम गळां बोले तदा अंगना,
'नाथा, प्रीति सदा अशीच असुं द्या दासीवरी नम्र या,
आहे ही इतुकी विनंति, दुसरी कांहीं नसे याचना,
शालू प्रीति च, शाल ती, कनक ती, रत्नें हिरे ती प्रिया !
स्त्रीजातीस पतीच दैवत खरें, सर्वस्व तें आमुचें;
नाथा, जाइल काळ हा निघुनिया, जाईल हें यौवन.
घाली मोह तुम्हांस सांप्रत असें कांहीं न राहील जें,
चंद्राला क्षय लागणार समजा आतां उद्यांपासुन.
कांता, वृत्ति नसो म्हणोनि तुमची सौख्यक्षणप्रेरित,
जावो ती विलया न, जाइल जसा वेगें सख्या, हा क्षण
नेत्रीं प्रेमळ अश्रु पाहुनि सखी एकाकि मी चुंबित
लावीं घट्ट उरीं, वदें न, मुख हें मद्बाव सांगे पण.
नक्षत्रें गगनीं जईं तळपती, ये दिव्य तारापती,
तेव्हां मत्स्मृतिदेवता प्रकटवी आजूनिही तो क्षण
ती रम्या रजनी, पयोधवल तें आकाश, तो सौध,
ती- प्रीतिज्योति सखी, विलोल नयनी तें वारि, तें चुंबन !