हिमाच्छन्न सरिता
जेव्हां हो अति तीव्र शीत, सरिता ओते हिमाच्छन्न ती,
भासे घोर शिलाच का पसरुनी गेली तळापासुन
वाहे निर्मळ त्या हिमांतरं परी गंभीर तें जीवन;
यंत्रें तो थर भेदितां वर निघे वेगें फवारा अती.
मद्दोषें घन मौन सेविशि सखे, जैं माझियेसंगती,
होशी निश्चळ त्या हिमापरि परी ठावें तुझें तें मन;
जाणें मी प्रणयें अगाध भरलें कांते, असे आंतुन;
त्यायोगें विनवीं परिपरि तुला मानी जरी मी अती.
लावीं दोष सखे, स्वतासचि तुला पाहूनि मी निश्चळ,
पीतां मी अपुलेंचि रक्त मुख हें होई अती पांडुर
तेव्हां तें मुख तो कठोर रथ गे तैं भेदितां आंतिल
प्रेमाब्धी बहु कालवे, नयनिं ये वेगें फवारा वर.
कांते, लोचन हे तुझे रमविती नाना रिती निर्मल,
तेव्हां अश्रुंतुनी सखे, झळकतां सर्वांत चेतोहर !