रासमंडळ गोपीचंदन
राऽसमंडळ गोपीचंदन तुलसिकि माला जय ! ध्रु०
अफाट पसरे वाळवंट बहु यमुनातीरीं जें
तिथे गाउनी नाचे कान्हा गोपाळांसंगें,
यमुना देई सूर तयां, वन कांठावर रंगे;
तें गाणें गावोनि नाचुं या देवहि गाती जें. १
हिरवें हिरवें गार शेत हें सुंदर साळीचें
झोके घेतें कसे ! चहुंकडे हिरवे गालीचे
लांब पसरले या ओढ्याच्या कांठाकांठानें.
खळखळ सळसळ मिसळे, मिळवूं या अपुलें गाणें.
त्या ओढ्याला त्या शेताला लाटा किति येती,
ओळी त्यांच्या एकामागुनि एक लांब जाती;
त्यांसह लाटा आनंदाच्या करिती मनिं थय् थय् ! २
पिवळें तांबुस ऊन कोवळें पसरे चहुफेर,
ओढा नेई सोनें वाटे वाहुनिया दूर.
झाडांनीं किति मुगुट घातले डोकिस सोनेरी,
अहाहा ! पहा तर सोन्याचा गोळा तो क्षितिजीं ! ३
सोनेरी मख्मली रुपेरी पंख कितीकांचे,
रंग किती वर तर्हेतर्हेचे इंद्रधनुष्याचे !
अशीं अचल फुलपांखरें फुलें साळिस जणुं फुलती,
साळीवर झोपलीं जणूं का पाळण्यांत झुलती.
झुळकन् सुळकन् इकडुनि तिकडे किति दुसरीं उडती,
हिरेमाणकेंपाचू फुटुनी पंखचि गरगरती.
उडूं, बागडूं, नाचूं, गरगर फिरूं चला मौजे ! ४
उद्यां सकाळीं मुलेंमुली त्या खेड्याहुनि येतां
येथे मंडल गोल उमटलें कुरणावर बघतां
टकमक बघतिल परस्परांना, कौतुक हें केवी !
म्हणतिल येथे नाच नाचल्या रात्रीं वनदेवी.
पहा पांखरें चरोनि होती झाडांवर गोळा,
कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा ?
वार्यापरि या चलूं घराला नाचतची थय्थय् ! ५