सृष्टिशिक्षण
"किती ह्रदय ओढिती हरिण !" तो प्रमोदें वदे,
"नरसम न हे कधीं फुगति जातिच्या दुर्मदें;
निषादभयही तयां न वनिं या कधीं कांपवी,
तयांसम निवास या वनिं कसा न तो सौख्य वी ?
सख्यासह अपाप या वनिं निवास होवो सदा,
स्वयेंचि वनिं जोडितों सकलशास्त्रसत्संपदा,
अहा सुखद शांत हें गहन काननीं जीवन !
श्रमांतिं सुख जें जगीं अधिक काय तें याहुन ?
न दुःख नयना जिथे पडति ते तिथे सोसण्या,
वनीं व परिहासही विफल सोसण्या सोडण्या,
जडाजड पदार्थ हे गुरु मदीय सारे वनीं,
शिकेन पशु-पांखरें-गिरि-तरू-झर्यांपासुनी."