डोळे हे जुलमि गडे !
डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका !
जादुगिरी त्यांत पुरी येथ उभे राहुं नका.
घालुं कशी कशिदा मी ? होती किति सांगुं चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी वेळ सख्या, जाय फुका.
खळबळ किति होय मनीं !
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि आग उगा लावुं नका !
डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका !