क्रुद्ध सुंदरीस
सजलीस जरी हें ह्रदय सखे, फाडाया
तरि पहा सांगतों, जपुनि करीं, या कार्या.
हें स्वल्प वाटतें काम मानिनी, का गे ?
पण वेडे, पडशी भ्रमीं खरोखर सांगें.
किति अहा फिरविशी डोळे गरगर रागें !
कां घुसळुं पाहशी ह्रदय सांग यायोगें ?
सोन्यांत खचविले हिरे तुझे ते डोळे
अति मोहक; करितिल काम कसे ते भोळे ?
किति लाल करोनी ओतिशि का अंगार ?
हा वेडे ! घेतें प्रेम उडी बाहेर.
किति पुन्हा पुन्हा वांकड्या भोवया करिशी ?
त्या उलट पोसती ह्रदय, सांग गति कैशी !
हे लाल करोनी गाल फुगविशी रागें
शेवंतिंत खुलतो गुलाब अधिकच ना गे ?
किति आव घालिशी असा ह्रदय फाडाया,
पण नीट पहा गे आंत आपल्या ह्रदया.
बघ आंत नीट निरखोनि काय तें झालें,
हें ह्रदय कसें मिसळोनि त्यामधें गेलें.
तीं दोन्ही झालीं एक कशीं मिसळोनी,
कां करितां येतिल भिन्न तुला परतोनी ?
जरि भिन्न न करितां करिशिल घाई ऐशी ?
होईल काय परिणाम कळे का तुजशी ?
जल दुधांत मिळतां काय अधीं फाटावें
हें तुम्हां स्त्रियांना काय अम्हीं शिकवावें ?
बघ नीट म्हणोनी ह्रदय अधीं अपुलें तें
घाईंत न फाटो हीच भीति मज कांते !