सत्प्रीतिमार्ग
कडकड कडकड तडित् कडाडे, जळतें नभ का तरी ?
तद्घातीं कडकडोनि पडती तरु मोडुनि भुवरी.
प्रचंड हा घनघोर दुमदुमे ध्वनि व्योमाभीतरी,
प्रळयकाळ ओढवला वाटे भयाण ही शर्वरी.
कोण असे अंधेरी झुकली घन ही गगनांतरीं !
कोसळतें नभ काय ! पडति जलधारा मुसळापरी.
हें जिकडे तिकडे जळमय झालें दिसे,
भुसरिता यांचा भेद न उरला असे,
थरथरा कांपती भ्याले तरुगण जसे !
त्वेषानें अति फों फों शब्दें फोंफावति निर्झरी,
फूत्कारति का कुटिल नागिणी जग गिळण्या स्वोदरीं !
जेव्हां दडती सिंहव्याघ्रहि भिउनी गिरिगव्हरीं,
घूकससाणे पक्षी दडती पुराणतरुकोटरीं;
घोर भयंकर मध्यरात्रिच्या ऐशा या अवसरीं
कोण झपाझप पाउल टाकित चाले विपिनांतरीं ?
रेखाग्र न या प्रळयभीतिची छाया वदनावरी,
खांचा, कांटे, सर्प गणीना, कोण असावें तरी ?
का वनदेवी ही निर्भय वनिं संचरे ?
का चपलामूर्तिच भूवरि या अवतरे ?
का वृष्टिदेवता निजकृति पाहत फिरे ?
झमकन् चपला चमके, परि वरि घन भूवरचे गिरी
दैत्य कसे झुंजति दावी, नच मार्ग दावि ते परी.
जीस उपवनीं फिरतां कुसुमें रुतती कांट्यापरी,
श्वान भुंकतां दूर भयें जी होय घरीं घाबरी,
केवळ नाजुक भीरु अबल ती गृहभूषण सुंदरी
निजवल्लभशोधार्थ चालली भयाण या अवसरीं.
कां चपले, व्यर्थचि शिणविशि तूं आपणा ?
कां घना, विफल तूं करिशी रे गर्जना ?
कां भिववुं पाहतां ऐसे प्रणयी जना ?
रोधुं नका सत्प्रीतिमार्ग, व्हा दूर तुम्ही झडकरी !
काय कळेना तुम्हां जगीं या काय प्रीति न करी ?