संध्यातारक
रवी जातां जातांच मंदिरातें
कोण डोकावुनि नभांतुनि पहातें ?
नभःसलिलीं का नील, करों केली
रती येई ? एकटी कशी आली ?
काय फुलली नलिनीच वरि सरीं हे ?
काय मधुपाची वाट पाहताहे ?
देवललनामणिहार गळोनीया
मणी पडला एकला अंगणीं या ?
रत्नकुंदक कीं काय हा स्मरानें
दिला झोकुनि गगनांत विहारानें ?
रोविली ही भरजरी का पताका ?
अमल रजनीराणिचा सुचवितो का ?
अहा ! संध्यातारका, द्युलोकीं तूं
वसशि परि तूं भूतलीं सौख्यहेतू;
एकवटला अनुराग तुझ्या ठायीं,
अहा प्रीतिज्योतीच पाजळे ही !
प्रणयतारक तूं, तुला गगनलोकीं
नयन वळवुनि सोत्कंठ जन विलोकीह
विरहपीडित युवतीस निजपतीशीं
जुळुनि आशीर्वच नित्य लाभतोशी
आणिशी तूं मधुपास कमलिनीतें,
तसा हंसा आणिशी हंसिकेतें;
धेनु हंबरडे देत घरा येती,
बघुनि वत्सांतें मुदित मनीं होती.
कृषक उत्सुक तो वाट तुझी पाही,
बघुनि तुजला गगनीं न हर्ष राही;
ठेवुनीया आउतें तो प्रियेला
श्रांत लंघित पथ येइ भेटण्याला.
विलोकीनी सप्रेम का वरोनी
बोलशी तूं सकलांस मधुर वाणी ?
'चला थकलां बहु झटुनि दिवस सारा,
सखीसह घ्या विश्रांति सौख्यसारा.
हल, तराजू, लेखणी अतां ठेवा,
ढोल, मुरली आणखी बीन सेवा;
त्यजुनि वटवट, गा मधुर मधुर गाणें,
रमुनि रमणीसह झोप सुखें घेणें.'
हाय जाऊं मी कुठें परी सांग,
असे माझा कोणता सांग मार्ग;
असे सुंदरि येथोनि दूर हाय !
मला सदनीं जाउनी लाभ काय ?