अजुनि लागलेंचि दार
अजुनि लागलेंचि दार, उजळे ही प्राची,
स्वेच्छ थंड गार झुळुक वाहतसे ताजी. ध्रु०
जागवि जी रम्य वेळ
कमलादिक सुमन सकल,
कां न तुला जागवि परि, कमलनयन साची ?
देवि कांति, गीति, प्रीति,
सकल मनीं उत्सुक अति,
दारिं उभ्या वाट बघति या तवागमनाची.
अरुणराग गगनिं कांति,
पक्षिगणीं मधुर गीति,
या ह्रदयीं तशी प्रीति, पुरव हौस यांची.
जीवित तुजवीण विफल,
कां मग हा विधिचा छळ ?
खचित तुझी मत्प्रीती छबि तव ही माझी.
ऊठ हे मनोभिराम,
तिष्ठतसें मी सकम;
रुदन करीं, कोठ परी मूर्ति ती जिवाची ?