घट भरा शिगोशिग
घट भरा शिगोशिग, भरा भरा !
वाहुं द्या दयेचा वरुनि झरा. ध्रु०
पुत्रोत्सविंही प्रसववेदना,
विवाहमंगलिं विरहयातना,
प्रणयरसोद्गमिं पापकल्पना,
हीं शल्ये सलती, हरा ! हरा ! १
दिनोद्गमीं रविमुखिं घनरेषा,
पूर्णचंद्रिं लांछन दे क्लेशा,
शुक्रमूखा दे तम परिवेषा;
हीं न्यूनें आतां दूर करा. २
रंग अडविती चित्रभावना,
सूर दुखविती मधुर गायना,
वर्ण जखडिती कोमल कवना,
शृंखला खिळति या, त्वरा करा. ३
ज्योतिर्मय ही सखिची कांती
वाटे कीं मुरवावी स्वांतीं,
झोकांडी दे न येचि हातीं,
ही माया निज संहरा, हरा ! ४