रे चेटक्या !
नादीं लागुनि तुझ्या चेटक्या, जारिण मी ठरलें. ध्रु०
नादीं लागुनि तुझ्या चेटक्या, जारिण मी ठरलें.
इहपरलोकां आंचवलें रे, तोंडघशीं पडलें.
सोंगाला भाळले तुझ्या रे, नेणुनि रूप खरें;
भोळि भुरळलें छायेला रे, फसलें प्रेमभरें.
सासु सासरे नणदा जावा
परोपरीनें धरिती दावा,
तुझाहि अजुनी न कुठे ठावा, न हें न तें घडलें. १
कधिं चंद्राच्या मिषें घालिशी डोळा मजवरती,
कधिं तार्यांच्या मिषें घालिशी कटाक्ष तीव्र अती,
प्रेमकलहिं तुं रागावुनि कधिं सूर्यमिषें बघशी
लाल शाल घालोनि कधिंकधीं उषामिषें हसशी,
करणी करुनी यापरि हरिलें
मन माझें तें, बहु चाळविलें;
खरें रूप परि कधिं न दाविलं, कपटचि आचरिलें. २
कामातुर मी सैरावैरा दाहि दिशा फिरतें,
पाठ पुरविती भुतें तुझीं रे, तुजला अंतरतें;
या दारीं त्या दारिं पाहिलें, कोठे दडलाशी ?
इथे ढुंकितें तिथें ढुंकितें, असुनि न कां दिसशी ?
लाज सोडिली, भीड मोडली,
परोपरी बोलणीं साहिलीं,
वण वण करितां कुडी भागली, मन हें बावरलें. ३
यापरि आतां किती गांजशिल ? करिशिल किति चाळे ?
पुरे सोंग हें ! पुरे खेळ हे ! मन हें कंटाळे.
सत्त्व पाहणें पुरे ! परीक्षा पुरे अतां सखया !
पाटाचा सोहळा लाभुं दे, आतां ये सदया !
नाक घासतें, पदर पसरितें !
निजरूपीं ये, किति आळवितें !
प्राणचि नातरि देइन परते ! काय जगीं उरलें ? ४