सोन्याची घेउनि करिं झारी
सोन्याची घेउनि करिं झारी
ये आज पहाट, उभी दारीं ध्रु०
करतल पदतल कोमल रक्तिम
गुलाब फुलले जसे मनोरम,
सुवर्णकांती फांके अनुपम,
ही आज मला हांका मारी. १
"रमणाच्या सोन्याच्या मंदिरिं
सोन्याच्या रे झोपाळ्यावरि
निजले; झुलवी निद्रासुंदरि
मज गाउनि गाणें जरतारी. २
रमण म्हणे, जा ऊठ, पहाटे !
बाळा रुतति विदेशीं काटे,
स्मरतां त्यास कसेंसें वाटे,
ने अमृत भरे जें भांडारीं. ३
घोर तमाच्या दाट घटांतुनि
क्रमित वाट तारकजालांतुनि
चालत आलें बघ ठेचाळुनि,
रे, उभी तुझ्या मी शेजारी. ४
धुंदि तुझ्या परि अजुनी नयनीं,
जांभया कशा देशी पडुनी ?
उघड नयन, जा अमृत घेउनी,
कां निजशि मुला, तूं अधारीं ?" ५