महा-प्रस्थान
दैत्यशी छातिवर ठेली तुजपुढें रात्र अंधारी;
चल जिवा, चालणें आलें; कां उगा बघशि माघारी ?
मुरडोनि कुणाला बघशी ? ये कोण तुझ्या सांगाती ?
चल, उचल बोचकें अपुलें जोडिलें तूंच जें हातीं.
कडु, गोड, तिखट, खारट जी जोडिली शिदोरी अंगें
घे उचल, तीच कामीं ये. दे कोण आपुली संगें ?
ये हांक किती निकडीची ! लागला तगादा पाठी,
राहुं दे शाल, पागोटीं, राहुं दे वाहणा, काठी.
या घरीं दिवे लखलखती, तुजपुढें परी अंधार;
परि सराय ही, न मिराशी; हें काय खरें घरदार ? १०
येथले हार डोळ्यांचे, बाहूंचे सुंदर शेले
गुंतविती तुजला मोहीं जरि जिवा आडवे ठेले
तरि काय तुला थांबविती ? कधिं कुणा रोकिलें यांहीं ?
मग कासाविश कां होशी ? चल मार्ग आपुला पाहीं.
येथल्या सतारी, वीणा येथल्या लकेरी ताना
स्वरपंजरिं कोंडूं बघती, परि तयां तुला धरवेना.
चल पुढें मुकाट्यानें तूं, आठवीं कुलस्वामीला,
डोळ्यांस अमंगल पाणी आणीं न अशा शुभ वेळां.
ऐक ती क्रूर आरोळी ! दरडावुनि येतीं हांका-
वाढवेळ आधिंच झाला, मग उशीर आणिक हा कां ? २०
जरि वाट तुला नच ठावी तीं ऐक पाउलें प्राणा,
रे धीर धरीं तूं पोटीं, संगिं ये जगाचा राणा.