जीवनसंगीत
संसार-सतारीवरि तारा
तूं मीहि' मदन वाजविणारा. ध्रु०
कलानिधी तो फिरवी चंचल
मधुरारक्त करांगुलि कोमल
अर्पुनि सारेंही कौशलबल;
वर्षती स्वरसुधेच्या धारा. १
लीलालोलुप तो रतिरंगीं
धुंद मद्यपी, तरलतरंगिं
प्रथम रसा घुमवी सुरसंगीं,
नाचवी मूर्त तो शृंगारा.
मधुर गुलाबी राग थरथरे. २
अकाल ये जणुं उषा मदभरें,
वायू निज चांचल्या विसरे,
प्राणही विसरला निज कारा.
स्वर्ग सुरांसह वर थरथरला, ३
जड शशि ज्योत्सनारूपीं द्रवला,
पुलकित धरणिस बहर उसळला,
चालतां थबकल्या नभिं तारा. ४
अपूर्व सुर-संमेलन रचिलें,
स्वरकल्लोळीं दृश्य बुडालें,
कोण पुसे जिवलगे प्रेमले,
लाक्डीच यंत्रा, संसारा ? ५