किति महामूर्ख तूं शहाजहां !
किति महामूर्ख तूं शहाजहां !
गुपित पळपुटें पंजरिं धरण्या व्यूह काय रचिलास अहा ! ध्रु०
ह्रदयाचें रे कपाट उघडुनि
अमूर्त कांहींतरि तें काढुनि
पाण्यापरि पैसा रे ओतुनि
तूं मूर्त करिशि तो ताजचि हा. १
स्वप्न तुझें तें निरर्थ छाया !
साक्षिदार निर्मिलास राया,
भलत्याच करी तुझ्या चहाड्या
या अर्थज्ञांना सदैव हा. २
चोहिंकडे रेला किंकाळुनि
देशाचें रे ओझें वाहुनि
जिवंत राखिति गोर्या कंपनि,
उपयोगि त्यांस का महाल हा ? ३
इथे न चेते भटारखाना
गोमांसाचा द्याया खाना
चोरांच्या भरण्या पोटांना;
हाणि का हाडुकें गरिबां हा ? ४
मायदेविचें शव फाडोनी
इथे नस का गणितो कोणी ?
ज्ञानकर्णी का भरितो गोणी ?
रे दिवे दिवे अकलेस अहा ! ५
दरवळोत निरपेक्ष फुलें तीं,
निरभिलाष वाहोत झरे किति,
फुकट चंद्र उधळो निज कांती,
परि अर्थशास्त्रिं रे नियम न हा. ६
पायतळीं ताजाच्या बसुनी
टकमक पाहो काळ गुंगुनी,
आदमच्या या खटल्याकारणिं
दुनिया बघ बाजारच हा. ७