रुद्रास आवाहन
डुमडुमत डमरु ये, खण्खणत शूल ये,
शंख फुंक्त ये, येइ रुद्रा !
प्रलयघनभैरवा, करित कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ! ध्रु०
कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ! १
पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्खट् तुझें खड्ग क्षुद्रां ! २
जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ! ३
पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ! ४