मातृभूमीप्रत
जन्मा येउनिया कुशीं तव; तुझ्या स्कंधीं उरीं वाढुनी
प्रेमाचा नच गोड शब्द वदलों केव्हां तुला आजुनी,
नाहीं एक विचारही अजुनिया त्वत्सेवनीं योजिला;
ऐशाला म्हणशील काय मजला तूं सांग गे आपुला ? १
जे त्वत्पुत्र उदारधी झिजविती काया तुझ्या सेवनीं,
जाळाया निज पोट ही शिणविली वाणी तयां निंदुनी;
व्हावा तोष धन्यास यास्तव सदा मी हासलों त्यांजला,
आतां तूं कुरवाळशील वद का ऐशा कुपुत्रा मला ? २
'खोटी ही दुबळी, गुलाम, भरला वृद्धापकाळीं चळ,'
ऐसा दोष दिला तुला वश परां होवोनिया केवळ;
आतां हें स्मरतां मना हळहळे तें; गे गळा दाटला-
डोळे तूं पुसशील काय पदरें घेवोनि अंकीं मला ? ३
जें त्वां जीवन हें दिलें, सकळ ही सत्ता तुझी ज्यावरी
जातां तें परसेवनीं न तिळही संकोचलों अंतरीं;
धिग्धिग् जीवन हें ! असें मन अतां धिक्कारितें गे मला,
त्यातें तूं धरिशील काय ह्रदयीं पान्हा फुटोनी तुला ? ४
आहाहा ! सुत ते असिव्रत जईं त्वत्सेवनीं पाळितां
धैर्याचे गिरि ते कधीं न डगले आकाशही फाटतां,
नेतां त्यांस दिगंतरास फुटला आई, उमाळा तुला-
डोळे तूं पुसशील का निज, यमें नर्कास नेतां मला ? ५