गौप्यमान
चंद्राच्या दीप्त पटांमधुनी
डोकावे छाया बघ वदनीं. ध्रु०
हरशिरिं डौलें जाउनि सजला,
स्मरें हरावरि बाण योजिला,
यासहि का ओझरता रुतला ?
घाव न ये अजुनी भरुनी १
विचित्र करि पोशाख भरजरी,
धवल विहासें न्हाणि जगा जरि,
लाजुनि यापरि घाव लपवि परि
दिसे टरफला भेदूनी. २
गृहविहीन हा पांथ भ्रमणा
करी, तयाचा जादूटोणा
कधीं स्पर्शला तुजला तरुणा ?
काय खुपे तुज सांग मनी ३
कधीं कुणीं डोळ्यांतुनि तुजला
बाण काळिजीं काय मारिला ?
घाव खोल जो त्याचा पडला
फुका लपविशी तूं हसुनी ! ४
खळखळ रस जरि वाणी प्रसवी,
तुझें हास्य जरि सकलां हसवी,
विलासलीला मला न फसवी,
झळके छाया किती नयनीं ! ५
प्रमदांच्या तूं कथा सांगशी,
व्याजोक्तीनें जनां दिपविशी ६