गाडी बदलली !
प्रवाहपतिता काष्ठांसम हो, कर्मधर्मयोगें
रेलेमधिं भेटले मुशाफर कुणी मनाजोगे.
झाले कुशल प्रश्न, परस्पर ओळख झाली ती,
एक दुजाची वर्दळ सोसुनि सोयहि ती बघती.
पीकपाणि कीं असहकारिता या गप्पा निघुनी,
मार्गाचे श्रम हलके करिती रंगुनि रंगवुनी.
डबे निघाले, काला झाला, फराळ मग झाले,
चंचि निघाली, विडे लागले, प्रेमानें खाल्ले.
घटिका भरली, संगमभूमी गाड्यांची आली,
एका जाणें गाडिंत दुसर्या, गर्दि एक झाली.
उठे भराभर, वळकुटि उचली, उतरे तातडिने;
हात हालवित सोबत्यां' पळे पुढे गडबडीनें;
रेल गांठली, वळकुटी ढकली, गर्दिंत तो घुसला,
जागा पटकवि, जीव हायसा होय, सुखें बसला.
घटिका भरली, शीटी झाली ढग फूत्कारीत
धापा टाकित धाडधाड ती रेल सुटे त्वरित.
अन्य दिशेनें क्षणार्धात ती दृष्टिआड झाली,
बघतां बघता मुशाफिरा त्या घेउनिया गेलीं,
गाडि बदललती यांत कशाचें भय, संकट, खेद ?
कां मग मरणा भ्यावें न कळे रटोनिया वेद.