रे मानसहंसा !
रे मानसहंसा माझ्या, उड्डाण तुझें अनिवार;
वायूहुनि तेजाहुनिही गति तुझी तरल ती फार
त्रैलोक्यीं गमन तुझेंरे, कोठें न तुला अटकाव;
रविकिरण न शिरती जेथे तेथेहि तुझी रे धाव.
क्षणिं नभीं क्षणीं पातालीं,
दशदिशांत एक कालीं,
कधिं शांति न ठावी जाली,
घेईल वीजही हार. रे० १
सामर्थ्य अतर्क्यचि तुझें, महिम्यास तुझ्या नच पार,
सुख व्हावें मजला म्हणुनी विश्वांत तुझा संचार.
आणिशी सुरासुर सकलां करुनिया तयां बेजार.
विश्रांति न माझ्या कामीं, मजवरी किती उपकार !
सूर्यहीं चितारी केला,
केलेंस फरास विजेला,
सारथी रथीं अग्नीला,
परि यांत काय रे सार ? रे० २
घालिशी हमामा कां रे ? विश्वांत कुठे सुखलेश ?
पतिवीण पसारा सारा हा फुका ! करिशि कां क्लेश ?
कारागृहिं कल्पलताही लावितां सुखाशा वाया !
बाजार मांडिल का रे ? निर्जीव भुतें ही छाया !
प्रिय सखा जिव्हाळा माझा
विश्वाचा सार्या राजा,
अंतरलें त्या पतिराजा-
त्यावीण काय संसार ? रे० ३
कालाच्या तीरावरुनी, मरणाच्या वेशीहून
घेउनी भरारी हंसा, अज्ञाती जाय शिरून;
प्रिय सखा पहा जा माझा प्राणाचा माझ्या प्राण,
तरि दूत खरा तूं हंसा, तरि खरें तुझें उड्डाण !
जा निरोप त्याला सांगें, जन्माची सांग कहाणी
"विरहानल जाळी सखया, वार्ताहि न कोणी आणी.
मी राणी या विश्वाची
जाहलें भिकारिण साची
विपरीत गती कर्माची,
विपरीत कसा व्यवहार !" रे० ४
"दिन गेले, वर्षे गेलीं, लोटलीं युगेंही नाथा;
तळमळें वियोगीं सखया, पाहशी अंत किति आतां ?
विसरशी कसा दासीला ? अपराध काय तरि झाला ?
कोणास शरण मी जाऊं ? कथुं दुःख तरी कोणालाअ ?
प्रार्थितें हात जोडोनी,
बहुवार पदर पसरोनी,
शांतवीं अता भेटोनी !
तुजवीण कोण आधार ?" रे० ५