दृष्ट हिला लागली !
दृष्ट हिला लागली पडे कुणा पाप्याची साउली ! ध्रु०
लिंबलोण ग कोणी उतरा,
जगदंबेचा ग अंगारा
लावा, बांधा गंडादोरा.
काळजि घ्या चांगली ! १
चाफ्यापरि गोरेपण पिवळं,
काकडीपरी अंग कोवळं,
मैद्यापरि लुसलुशीत सगळं,
दृष्ट पडुनि करपली ! २
ज्यांच्या पोटीं उदंड माया
लेकुरवाळ्या आयाबाया,
पोक्त शहाण्या आणा दाया,
दावा चाफेकळी. ३
चिमणिसारखं तोंड जाहलं,
डोळ्यावरचं तेज चाललं,
नाक उंच वर येउं लागलं,
गत कशि ग जाहली ! ४
विशाळ डोळे लावुनि वरती
चित्रें पाही जशि काकुळती,
मधेंच दचकुनि कान देइ ती,
पोर बाइ बहकली ! ५
करकरीत तीनी सांजा ही
देवदर्शना एकलि जाई,
वार्यापरि ही अचपळ बाई
द्रुष्टें कुणि पाहिली ! ६
गरिब भोळसर आयाबाया,
खर्या दृष्टिची वार्ताहि न यां !
अनुभव घेउनि सारें वाया !
माया खरि अंधळी ! ७