तें दूध तुझ्या त्या घटांतलें
तें दूध तुझ्या त्या घटांतलें
कां अधिक गोड लागे न कळे. ध्रु०
साईहुनि मउमउ बोटें तीं
झुरुमुरु झुरुमुरु धार काढिती,
रुणझुणु कंकण करिती गीती,
का गान मनांतिल त्यांत मिळे ? १
अंधुक शामल वेळ, टेकडी,
झरा, शेत, तरु, मधें झोपडी,
त्यांची देवी धारहि काढी,
का स्वप्नभूमि बिंबुनी मिसळे ? २
त्या दृश्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर,
जादु येथची पसरे मजवर,
का दूध गोडही त्याचमुळें ? ३