नटेश्वराची आरती
आरती त्रिभुवनजनकाची,
अर्धनरनारि-नटेशाची ! ध्रु०
झळके पुरुष अर्धभागीं,
लखलखे नारी अर्धांगीं,
सीमा ऐक्याची संगीं !
कोटि रतिमदन
मनोरम वदन
लाजतिल बघुन,
खपेना आड शरीराची !
जय जय सांत-अनंतांचीं ! १
अपर्णा तुजविण नीरस ती,
पार्वती शिलाच ती नुसती !
ज्योतिविण केवळ ती दिवटी.
तूंहि तिजवीण
देह गुणहीन,
शून्य रसभिन्न !
काय गति तुइया प्रेमाची !
जय जय सांत-अनंतांची ! २
अंबिका लाभतांचि संगा
प्रसवे खळखळ भवगंगा,
अनंगहि येई मग रंगा !
सूर्य झळझळति,
चंद्र लखलखति,
उडू लुकलुकति,
रम्यता गति ही प्रेमाची !
जय जय सांत-अनंतांची ! ३
मंदिर नक्षत्रीं जडलें,
रविशशि झुंबर लोंबविले,
सीमा सौंदर्या न मिळे,
तूंच शशिसूर्य,
तूंच सौंदर्य,
मंदिरहि दिव्य,
रूपें लीला ही ज्याची,
जय जय सांत अनंताची ! ४
नीलमणिरचित तबकिं गगनीं
निरांजन रविशशि पाजळुनी
आरती करी सृष्टी-रमणी;
झांझ झंझणण,
वायु, दण्दणण,
नगारा गगन,
भास्कर भक्ति तुझी याची,
जय जय सांत - अनंतांची ! ५