जीवितसाफल्य
सुफलित झालें गे सखि जीवित ध्रु०
युगानुयुग ज्या त्रिभुवनिं शोधीं निधान तें तव नयनिं मिळालें. १
जन्मजन्मिंचें क्षुधाव्यथितमन लाभुनि तुज आकंठचि धालें. २
कंटकमय या अनंत समयीं श्रमुनि दमुनि मन सुखीं निमालें. ३
नयनद्वारीं शिरुनि गगनिं मन रविशशिउडुंतुनि अमृतचि प्यालें. ४
काय भय जरी मरण ये अतां विषवृक्षा फल अमृताचि आलें ! ५