निरोप घेतांना
जगाच्या बागेंत
फुललें मी फुल,
लागली चाहूल
प्रेमी लोकां. १
जन जिव्हाळ्याचे
भोवती मिळाले;
मज सांभाळिलें
नानापरी. २
अगे मायभूमी,
किती लाडके मी !
अंकीं घेशी प्रेमीं
मज दीना. ३
अहा रे वरुणा,
वर्षोनी करुणा,
पाजिलें जीवना
दिसंदीस ४
जगाच्या लोचना,
न्हाणोनी किरणीं
इंद्रचापवर्णी
शृंगारीले. ५
अगा वायुराया,
कोवळ्या अंगुली
लावोनिया गालीं
हासव्लें. ६
जातें ! मज आतां
मंगलाचें धाम
मूर्त जगत्प्रेम
बोलावीतें. ७
घराशीही जातां
हुरहूर वाटे,
अश्रूपूर दाटे
लोचनांत. ८
असें हीन दीन
सार्यांचें मी ऋणी,
उपेक्षिलें कुणीं
नाहीं दीना. ९
नानापरी झाले
अपराध कोटी,
घालोनिया पोटीं
क्षमा कीजे. १०
आतां शेवटील
परिसा विनंती
पायीं डोई अंतीं
ठेवीतसें ११
लोभ असों द्यावा
आतां पूर्वींपरी,
जरी जातें दुरी
काळाआड. १२
सारे प्रेमीजन
करा बोळवण,
पुढे आठवण
राहूं द्यावी. १३