उदार चंद्रा !
उदार चंद्रा, तुला नमुनि मी मार्ग धरीं आपुला. ध्रु०
शतदा आतां घालीं फेरी,
त्रिलोकगामी दृष्टि रुपेरी
दिशादिशांतुनि टाकुनि हेरीं,
तुज न दिसें प्रेमला ! १
सागरतळिं रे कर खुपसोनी
ह्रद्गत ओढीं वर चेववुनी;
वार्ता न मिळे माझी फिरुनी,
पूस जागवुनि जला. २
नदीतटीं कीं सागरतीरीं,
दिङ्मृगजलिं वा व्योमसरोवरिं,
कालपुलिनिं वा अफाट हेरीं,
बघशि न या पाउलां ३
तरुणतरुणि तूं सहस्त्र बघशिल,
ज्वाला त्यांच्या उरिं भडकविशिल,
वेलिवायुसा त्यां हालविशिल,
नच स्पर्शशिल मला. ४
कमलवनीं वायूस निमंत्रुनि
मज्लस भरवुनि मद्य पाजुनी
कळ्या हसव गुदगुल्या करोनी,
हासविशिल नच मला. ५