धडपडणारा श्याम 117
माझी आई गेली. मी पोरका झालो. तिच्या शेकडो स्मृती त्या वेळेस हृदयात उसळल्या. मी दु:खीकष्टी होऊन पुण्याला परतलो. आईची सारी क्रिया करून मी पुण्याला आलो. आता मी नेहमी मलूल दिसे. जसे पडलेले पान, गळलेले फूल, माझ्या जीवनाची सतार तुटली, फुटली. आता कोठले संगीत, कोठला आनंद? कोठले हास्य, कोठले लास्य? मी त्या जिन्यात दीनवाणा बसे, उदासपणे बघे. एकदम डोळे भरून येऊन, मी तेथेच जिन्याची पायरीच माझ्या आईची मांडी समजून, डोके ठेवून रडे. माझ्यातली जणू सारी शक्ती गेली, असे मला वाटे. पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे माझी दशा झाली. आता कोठचे उडणे? आता अखंड रडणे! 'आई, आई अशी हाक मारी. कोण मला उत्तर देणार, कोण माझ्याजवळ येणार? आई कायमची अंतरली. श्यामला सोडून आई गेली. सदानंदाकडे गेली. आम्ही का वाईट होतो? मी का वाईट होतो? श्याम का अगदी वाईट होता? श्याम वाईट होता, म्हणूनच आई गेली. वाईट वाईट श्याम. टाकाऊ श्याम, भिकारडा श्याम, रड, आता रड. फुकट माझे जीवन, व्यर्थ माझे शिक्षण. आजारीपणात आईची सेवा मला करता आली नाही. तिचे पाय मी चेपले असते. तिचे डोके मी दाबले असते. तिचा मंगल हात माझ्या डोक्यावरून मी शेवटचा फिरवून घेतला असता. परंतु दुदैवी श्याम! त्याला हे असे भाग्य कोठले मिळायला?
माझ्या मित्रांना माझी भीती वाटू लागली. श्यामचे कसे होईल, असे त्यांना वाटे. आईच्या वियोगदु:खातून मी पार जाईन ही नाही, ह्याची त्यांना शंका येई. परंतु आईचे प्राण जाताच, श्यामचे प्राण निघून जाण्याइतका श्याम भाग्यवान नव्हता. त्याच्या कपाळाची रड संपायची नव्हती. त्याची धडपड संपायची नव्हती. हळूहळू मी पुन्हा माणसाळलो. दु:ख ओसरले, परंतु एखादे वेळेस अकस्मात मला भरून येई. आईची आठवण मला कधी, कोठे, केव्हा येईल, ह्याचा नेम नसे.
एके दिवशी मी उपाशी होतो. आमच्या वाडयाजवळच शंकराचे देऊळ होते. सांयकाळी मी त्या मंदिरात बसलो होतो. शंकरासमोर दोन-चार दिडक्या पडलेल्या होत्या. माझ्या पोटात अत्र नव्हते. त्या दिडक्या आपण उचलून घ्याव्या असे माझ्या मनात आले. गुरव तेथे नव्हता. मी एकदम शंकरासमोर गेलो व त्या चार दिडक्या उचलून घेतल्या. देवाला राग येणार नाही, असे मला वाटले. देव म्हणजे माताच ना? आपले एक लेकरू उपाशी आहे, हे त्या देवाला आवडेल का? जवळ एक मुलगा भुकेने काळवंडला असता, आपल्यासमोर दिडक्या पडत आहेत, ह्याचे हालाहालप्राशनापेक्षाही संकट शंकराला वाटले असेल! मी माझ्या मनाचे असे समाधान करीत होतो. मी रस्त्याने जात होतो; परंतु एकाएकी मला आईचे स्मरण झाले. रस्त्यातच मी उभा राहिलो. 'श्याम, दुस-याच्या वस्तूला लागलेले हे पाहिले व शेवटचे हात. पुन्हा कधी कोणाच्या वस्तूला हात लावू नकोस.' हे आईचे शब्द आठवले. मला लाज वाटली. माझ्या आईला शोभेसा मी मुलगा नव्हतो, म्हणूनच ती गेली, असे मला वाटले. मला रडू आले. मी पुन्हा शिवालयात आलो. त्या चारी दिडक्या मी पुन्हा तेथे ठेवल्या. देवाला साष्टांग प्रणाम घातला. नंतर मी त्या बुधवारच्या बागेत जाऊन बसलो. आईची आठवण येऊन त्या बागेतील बाकावर मी अभिषेक केला. ते थंडगार बाकही माझ्या त्या कढत अश्रूंनी मृदू होऊन गेले असेल!
एकदा मी मंडईत गेलो होतो. फळांच्या राशी मी तेथे पाहिल्या आणि एकदम माझी आई मला आठवली. मला एकदम रडू कोसळले. मंडई सोडून जवळच तुळशीबागेत मी जाऊन बसलो. तेथे हृदय हलके केल्यावर, मग मी पुन्हा मंडईत गेलो. माझ्या आईला कोकणात एकही फळ आजारात मिळले नसेल, असे मला राहून राहून वाटे आणि भडभडून येई. मी घरी आलो, तो उशीर झाला होता.