धडपडणारा श्याम 113
''श्याम, तू इतकी पुस्तकं कशाला आणतोस?'' रामने विचारले.
''माझ्याने राहवत नाही. उपाशी राहवं, पण पुस्तकं घ्यावं, असं मला वाटतं,'' मी म्हणालो.
खरोखरच माझ्या खिशात पैसे असले, म्हणजे ते पुस्तके, नाही तर सुंदर चित्रे घेण्यातच जायचे. देशभक्तांचे कार्डाच्या आकाराचे कितीतरी फोटो बाजारात असत. ते सारे विकत घ्यायचे मी ठरवले. देशभक्तांची अनेक नावे त्या बाजारात असणा-या चित्रांवरून मी प्रथम शिकलो. मागून त्यांची मी माहिती मिळवू लागलो. त्या थोरांची आपल्याला काहीही माहिती नाही, ह्याची मला लाज वाटे. अशा रीतीने मी माझ्या मनोबुध्दीला खाद्य पुरवीत होतो. माझ्या भावना प्रगल्भ होत होत्या. मला नवीन विचार मिळत होते.
एके दिवशी मी ग्रंथ-संग्रहालयातून बाहेर पडत होतो, तो एक ओळखीचे गृहस्थ भेटले. माझ्या हातात पुस्तक होते.
''कसलं आहे पुस्तक?'' त्यांनी विचारले.
'' 'आमच्या आयुष्यातील आठवणी,' रमाबाई रानडयांनी लिहिलेलं पुस्तक,'' मी म्हटले.
''इथे मोफत मिळतात वाटतं पुस्तकं?'' त्यांनी प्रश्र केला.
''मोफत कशी मिळतील?'' मी म्हटले.
''मग तुमची ओळख आहे वाटतं चिटणिसाशी?'' त्यांनी पुन्हा प्रश्र केला.
''नाही बुवा,'' मी उत्तर दिले.
''मग कुणी पुस्तकं दिलं? शिक्का तर संग्रहालयाचा आहे. वर्गणीदारांशिवाय पुस्तक मिळत नसेल?'' ते म्हणाले.
''मी वर्गणीदार आहे,'' मी सांगितले.
''अहो, तुम्ही वारकरी आहांत ना?'' त्यांनी आश्चर्याने विचारले.
''हो,'' मी शांतपणे उत्तर दिले.
''वारकरी असून वर्गणीदार होता? वर्गणी भरायला तुमच्याजवळ पैसे आहेत वाटतं, जेवणासाठी मात्र नाहीत? ही दुस-याची तुम्ही फसवणूक करीत आहांत,'' ते म्हणाले.
''उपाशी राहूनच मी वर्गणीदार झालो आहे. माझे सारे वार नाहीत. तरीही महिन्याचे चार आणे पोटाला उपाशी राखून, मी ह्या ग्रंथ-संग्रहालयाला देत असतो व विचारांचं खाद्य मिळवीत असतो. मी कुणाची फसवणूक नाही करीत, फक्त माझ्या पोटाची फसवणूक आहे,'' मी म्हटले.
''पोटाला भरपूर खायचं नाही आणि म्हणे पुस्तकं वाचा! तुम्ही एक विचित्रच वारकरी आहांत. स्पष्टच सांगायचं झालं, तर तुम्ही वेडे आहात. मूर्ख आहांत. आधी खा पोटभर,'' ते सद्गृहस्थ म्हणाले व निघून गेले.
वारकरी असून वर्गणीदार होणे, हे त्या गृहस्थांस पाप वाटले. माझे सारे अत्रदाते असेच म्हणतील का? रामच्या घरची मंडळीही मला नावे ठेवीत असतील का? श्याम गरीब आहे. मग ही पुस्तकांची ऐट त्याला कशाला, असे का ते मला म्हणतील? मला काही कळेना. 'लोक काही म्हणोत. तू विचारांचा उपासक हो' असेच माझ्या मनाने मला सांगितले व तेच मी ऐकले.