धडपडणारा श्याम 76
पुन्हा आईजवळ
मी आता औंधला रुळल्यासारखा झालो होतो. कधी एकनाथकडे भाकरी खावी, कधी खाणावळीतून भाकर-भाजी आणावी, कधी हाताने जेवण करावे, कधी काहीच करु नये, असे चालले होते. मिळेल ते खायला आणि शाळा झोपायला, असा कार्यक्रम सुरु होता. हळूहळू भावाच्या मरणाचे दु:खही कमी झाले. दु:खावर काळासारखा कोणताही उपाय नाही. जसजसा काळ जातो, तसतसा दु:खाचा वेगही कमी होतो. ,
सहामाही परीक्षेत मलाचांगालेच मार्क मिळाले. संस्कृतमध्ये तर नव्वद मिळाले. मराठीची माझी उत्तरपत्रिका काळेमास्तरांनी वर्गात वाचून दाखवली. काही प्रश्नांची उत्तरे त्यांना फारच आवडली. ते म्हणाले, '' ह्या उत्तराला किती मार्क द्यावे, मला समजेना! परंतु जास्त मार्क देता येत नव्हते.''
मला समाधान वाटले. काही मित्रांनी मोफत बोर्डिंगसाठी अर्ज करण्याबद्दल सुचवले. ते म्हणाले, '' तुझे मार्क त्या अर्जात लिही. खात्रीने तुला मोफत बोर्डिंग मिळेल.'' परंतु माझी तयारी नव्हती. ''सध्याचा स्वतंत्र प्रयोग ठिक आहे.'' असे मी म्हटले.
संस्थानिकांच्या मर्जीवर विसंबून राहाण्यापेक्षा आपल्या मित्रांच्या प्रेमावर विसंबणे मला अधिक प्रशस्त वाटते. एकनाथने प्रेमाने दिलेली भाकरी, मुजावरने प्रेमाने दिलेले वरण , ह्यातली गोडी काही और होती. ती गोडी त्या मोफत बोर्डिंगच्या अन्नात मला लागली नसती.
माझ्या ह्या जीवनाक्रमात एकाएकी विघ्न आले. औंधला प्लेग सुरु झाला. आधी माकडे पटापट मरु लागली. औंधला वानर पुष्कळ. हे वानर मरुन पडू लागले. प्लेगमध्ये उंदीर मरतात, तसेच वानरही मरतात. रोज आम्ही मरणाच्या वार्ता ऐकू लागलो. प्लेगने लागलेल्या एका गृहस्थाला भेटायला आलेला दुसरा गृहस्था येता क्षणी प्लेगने स्वत: लागून तडकाफडकी मरण पावला! शुध्द हवेतून जो मनुष्य दूषित हवेत येतो, तो अधिक लवकर अशा साथीला बळी पडतो. आमची शाळा बंद होणार, अशी वार्ता कानी आली. पुष्कळ परगावची मुले भीतीने अधीच निघून गेली.
परगावच्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब निघून जावे, असे फर्मान सुटले. शाळा बंद झाली. मुले आवराआवर करु लागली. मी कोठे जाणार? मावशीकडची मनीऑर्डर येणार होती; परंतु ताबडतोब निघणे प्रास्त होते. शेवटी वडिलांनी मोठया प्रेमाने दिलेली घोंगडी मी विकली. काही सुंदर पुस्तके विकली. जाण्यापुरते पैसे मी उभे केले. मीही माझी आवराआवर केली.
एका बैलगाडीत आम्ही सर्वांचे समान घातले. सखाराम, मी, एकनाथ, वामन, गोविंदा, बंडू सारे निघालो. बंडू गाडीबरोबर गेला. बाकीचे आम्ही पायी निघालो. एकनाथ व वामन आपल्या घरी जाणार होते. रहिमपूर स्टेशनच्या जवळच त्याचं गाव होते. औंधहून निघालो, तरी औंधचा प्लेग संपताच मीपरत येणार हातो. औंध मी कायमचे सोडतो आहे, असे त्या वेळेस माझ्या ध्यामीमनीही नव्हते. ते तळे, तो झरा, ते यमाईचे देऊळ, मी आमची आश्रयदाती शाळा, हयांना मी का कायमचा मुकत होतो? दाजीबांची सतार का पुन्हा कानांवर पडायची नव्हती? बापूच्या आईकडची भाकरी का पुन्हा खायला नव्हती मिळायची? दुपदीच्या आईकडचे गाईचे फेसाळ ताजे दूध का पुन्हा पाहायला मिळायचे नव्हते? एकनाथची दिलदार व प्रेमळ संगत का संपली?
मी औंधला पुन्हा येणार, औंधहूनच मॅट्रिक होणार, असाच विचार करीत मी जात होतो. आम्ही मित्र नाना प्रकारच्या गप्पा मारीत होतो. शब्दांच्याभेंडया लावण्यात तर फारच मजा आली. वाटेत मला शौचाला लागले, एका नाल्याच्या काठी गेलो. तेथे एक भला मोठा काटा, त्या चिखलात, माझ्या पायात मोडला. त्या वेळेस मी अगदी कळवळलो. जसा एखादा खिळा पायात घुसावा, तसा तो काटा घुसूंन बसला. माझे मित्र पुढे गेले होते. मी रस्त्यातून लंगडी घालीत पळत होतो. किती कष्टने मी जात होतो, ते माझे मला ठावे. शेवटी एकदाचे माझे मित्र मी गाठले.