धडपडणारा श्याम 31
वर्ग पुन्हा सुरु झाले. संपले एकदाचे दुसरे दोन तास. मोठी मधली सुट्टी झाली. मी पळतच घरी गेलो. जवळच होते माझे घर. ती माझी अंधारी खोली; परंतु त्या अंधारात आता प्रकाश आला होता. ती खोली म्हणजे माझे मंदिर झाले. म्हातारी बाहेर बसली होती. तिचा म्हातारा नवराही तेथे होता.
''श्याम, आज आत्तासा आलास?'' तिनेच प्रथम विचारले.
''मधली सुट्टी आहे?'' मी म्हटले
''रोजच असते ना?'' तिने विचारले.
''हो,'' मी हसत म्हणालो.
''मग रोज येत नाहीस तो? आज वहीबिही राहिली वाटतं घरी?'' तिने प्रश्न केला.
''नाही,'' मी म्हटले.
''मग का बरं आलास उगीच वेडयासारखा?'' गोड हसत ती बोलली.
''आलो आईला पाहाण्यासाठी,'' मी म्हटले.
''कुठे आहे आई?'' तिने विचारले.
''ही इथे बसली आहे,'' मी म्हटले.
म्हातारी गहिवरुन म्हणाली, ''श्याम, आई ती आई. मला आईचं प्रेम कसं देता येईल?''
''आज तुम्ही नाही का दिलंत? तुम्ही किती प्रेमाने माझ्याकडे बघता, किती प्रेमाने बोलता! तुम्ही मला श्याम हाक मारता, ती गोड लागते. माझी आई इथे असती, तर नसतो का मी घरी आलो मधल्या सुट्टीत?'' मी म्हटले.
''परंतु आईने मधल्या सुट्टीत काही खायला दिलं असतं,'' म्हातारी म्हणाली.
''गरीबं आई काय देणार? गरीब आई पाठीवरुन हात फिरवते, प्रेमाने पाहते,गोड बोलते. त्यातच सारं येऊनं जातं,'' मी म्हटले.
''कुणी रे शिकवलं तुला असं बोलायला?'' तिने विचारले.
''देवाने,'' मी म्हटले.
''श्याम कसा बोलतो बघा,'' मी आपल्या नव-याला म्हणाली.
''आपला तुकाराम आहे का त्याला माहीत?'' म्हातारा म्हणाला.
''त्याला कसा असेल माहीत?'' ती म्हणाली.
''कोण तुकाराम?'' मी विचारले.
''आमचा भाचा आहे तुकाराम. त्याला भेटायला आम्ही आलो आहोत. आम्हांला तो भेटायला येऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्याला भेटायला येतो,'' म्हातारी म्हणााली.
'ते तुम्हांला भेटायला का येत नाहीत?'' मी उत्सुकतेने पुसले.
''माझ्या तुकारामावर चोरीचा वहीम आला होता. त्याला शिक्षा झाली. पाच वर्षाची कैद झाली. त्याचा गुन्हा नव्हता. परंतु देवाघरी न्याय असतो. श्याम, ह्या दुनियेत कुठला न्याय? तो इथल्या तुरुंगात आला. तो प्रामाणिक व हुषार आहे. इथल्या सरकारी छापखान्यात तो काम शिकला. पुढे तो इंजिन, वगैरे चालवायला शिकला. इथे सरकारी पिठाची गिरणी आहे ना? ती तुकारामच चालवतो. हल्ली तुकाराम तसा तुरुंगात नाही; परंतु औंध सोडून त्याने जायचं नाही. सजा संपेपर्यत तो इथेच राहणार. त्याला बरीच माफी होईल. मग येईल घरी. तुझी नि त्याची देईन हो ओळख करुन तो रात्री कदाचित येईल,'' म्हातारी म्हणाली.
''तुमचं गाव कोणतं?'' मी विचारले
''विटे. पंढरपूरच्या रस्त्यावर आहे,'' म्हातारी म्हणाली.
''देवाच्या रस्त्यावर तुम्ही आहात. हजारो वारकरी दिंडया घेऊन, अभंग म्हणत, तुमच्या घरावरुन जात असतील,'' मी म्हटले.
''खरं बोललास, आमच्या घरी कितीतरी वारकरी उतरतात. भजन करतातत. आम्हीही दोघं वारीला जातो. वारी आजपर्यत कधीही चुकली नाही. आता आम्ही दोघ थकलो, तरीही जातो. हातात टाळ घेतला, खांद्यावर दिंडी घेतली नि तोंडाने 'ग्यानबा तुकाराम' सुरु झालं, की श्याम, थकलेल्या पायांतसुध्दा बळ येतं. हसतोस काय?'' म्हातारी म्हणाली.