धडपडणारा श्याम 83
''आलास सुखरूप, तुझ्या वाटेकडे बाळ, सारखे डोळे होते. त्याला नेलं देवानं. म्हटलं तू तरी दृष्टीस पडतोस की नाही. ' आज आता श्याम नाही येत, बोटीच्या गाडयांची वेळ झाली' असं म्हणून ते आत्ताच फुलं-दूर्वा आणायला गेले. बस हो बाळ.'' आईच्याने बोलवेना. मी अंथरूणात निजलो. धाकटा भाऊ पुरूषोत्तम माझ्याजवळ आला. आम्ही एकमेकांच्या अंगावर हात ठेवून झोपलो. सदानंदाची आठवण येऊन, न बोलता आमच्या डोळयांना पाणी आले.
वडील आले. त्याच्या मी पाया पडलो. त्यांनाही भरून आले.
''श्याम, पत्र लिहू नये का रे?'' ते म्हणाले.
आईच्या प्रकृतीवर सदानंदाच्या मरणाचा खोल परिणाम झालेला मला दिसत होता. आमच्यासाठी ती हसे, समाधान दाखवी; परंतु तिचे ह्दय होरपळले होते. सदानंद म्हणजे खरोखर एक रत्न होते. सर्वाना चटका लावून तो गेला. आई अशक्त झाली होती. तरी खरोखर एक रत्न होते. सर्वाना चटका लावून तो गेला. आई अशक्त झाली होती. तरी माझ्यासाठी ती काही ना काही करी. गेलेल्या मुलाचे दु:ख गिळून, आलेल्या मुलासाठी ती गोडधोड करी. एखादे वेळेस ती औंधच्या हकीकती विचारी. मी सर्व सांगे
''आई, तुझ्या श्यामला तू सर्वत्र आईस देतेस. औंधला दु्रपदीच्या आई, बापूची आई माझी काळजी घेतात. पंढरपूरच्या विटे गावच्या आजीबाईचं तर माझ्यावर किती प्रेम! मधल्या सुट्टीत मला खडीसाखरेचा खडा द्यायची हो ती. शिवायं कितीतरी नवीन नवीन प्रेमळ मित्र मला मिळाले. एकनाथ, गोविंदा तुला किती नांव सांगू! मी म्हटले.
'' सारी देवाची कृपा. 'श्यामला सांभाळा हो असं मी कितीदा देवाला म्हणत असत्से! आई म्हणाली आईची ती प्रार्थना हेच श्यामचे बळ होते. नाहीतर ह्या दुबळया, नेभळया श्यामचा जगात निभाव लागता ना. मला मिळणा-या स्नेह - प्रेमामृताच्या मुळाशी माझ्या आईची ती आंतरिक प्रार्थना होती. तिची ती प्रार्थना अजूनही मला पुरते आहे व भरपूर प्रेम मिळत आहे. त्या प्रार्थनेमुळेच श्याम उघडा पडत नाही.
मी पालगडला येऊन जवळ जवळ दोन - तीन आठवडे झाले. औंधचा प्लेग हटला नव्हता. प्रिय एकनाथनचे पत्र आले होते; परंतु माझ्या वडिलांना हळूहळू माझ्याबद्ल संशय येऊ लागला. मी घरी राहायला आलो, असेच त्यांना वाटले. एके दिवशी त्या अर्थाचे त्यांचे शब्द माझ्या कानांवर पडले मी दु:खी झालो. मी का वडिलांना खोटे सांगून फसवीन? शाळा सुरु असूनही शाळा सुरु झाली नाही, असे सांगेन, जेथे अविश्वास आहे, तेथे कशाला राहा असे माझ्या स्वाभिमानी मनात आले.
''आई, मी आता इथे राहात नाही. जाऊ दे मला. तुझी प्रार्थना माझं संरक्षण करील,'' मी म्हटले.
''बाळ, आमच्या दुबळया प्रार्थना कोठवर पुरतील? सदानंदासाठी का मी प्रार्थना करीत नव्हते? मुद्दाम आगीत उडी घेऊ नये.
अरे, निराशेमुळे त्यांना तसं वाटतं. त्यांच्यावर रे काय रागावतोस? आई-बापांजवळ रे कसला आला आहे स्वाभिमान? मी त्यांना सांगेन,'' आई माझी समजून घालीत होती; परंतु मी ऐकले नाही. मी हट्ट धरला. मी माझे कपडे धुवायला घेऊन निघालो.
''श्याम, जाणारच का मग? जा हो ; परंतु रागावून नको जाऊ ठेव ते सदरे. मी आणीन हो धुऊन. आईच्या हातचे धुतलेले घेऊन जा,'' ती म्हणाली.
मला त्या वेळेस रडू आवरले नाही. मी भिंतीशी रडत उभा राहिलो. आईने मला उगी केले; परंतु तिचे डोळे तरी कोठे कोरडे होते? आईने सदरे धुतले. वाळल्यावर त्यांच्या मी घडया घातल्या. पुस्तकांची ट्रंक मुंबईला भावाकडेच ठेवली होती. माझी वळकटी मी तयार केली मी पांढरी घोंगडी विकली होती.
आई म्हणाली,'' ''श्याम, हा पुसाचा महिना थंडीचा कडाका असले तिकडे. ती दुलई घेऊन जा. जरा फाटकी आहे. पण थंडी राहील,''
मी दुलई घेतली. संक्रात जवळ आली होती. तरीही मी राहिलो नाही. संक्रातीला आपण तोंड गोड करतो; परंतु आईचे तोंड कडू करुन मी जात होतो. तरी एके दिवशी भरीत व खिचडी तिने केलीच केली.
''श्यामच्या आई, श्याम संक्रांतीपर्यंतसुद्भा नाही का राहात?'' जानकीबाईंनी आईला विचारले.
''नाही म्हणतो. मुलं मोठी झाली, म्हणजे त्यांच्या कलाने घ्यावं. तिळगुळ त्याला बरोबर बांधून दिला आहे. स्वत: घेईल नि सर्वाना देईल,'' आई म्हणाली.
मी ते बोलणे ऐकत होतो; परंतु जाण्यचा निश्यच अभंगच राहिला. मी पुरुषोत्तमचा व मायबापांचा निरोप घेऊन घर सोडले. माझ्या आईचे ते शेवटचे दर्शन होते, ती शेवटची भेट होती, ते शेवटचे बोलणे होते; परंतु ह्या दुदैवी श्यामला ते कोठे माहीत होते?