धडपडणारा श्याम 8
ज्ञानाचा आरंभ नम्रता
रात्री मी अंथरुणात अश्रूंचा पाऊस पाडीत होतो आणि बाहेर मृगाचा पाऊस पडत होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले होते.
''श्याम, चल तळयावर आंघोळीला,'' सखाराम म्हणाला.
''परसाकडणं, तोंड धुणं कुठं करायचं?'' मी विचारले.
''तिकडेच, सारं करु,'' तो म्हणाला.
आम्ही तळयावर आलो.
''त्या शेतात कुठेही शौचाला जा,'' सखाराम म्हणाला.
मी लोटी घेतली व निघालो.
काळीभोर शेते दिसत होती, पावसाने भिजलेली होती. मी शेतात पाऊल टाकले. ते एकदम ढोपरभर खोल गेले. देशावरची मऊ मऊ जमीन! मला तिचा अनुभव नव्हता. मी त्या मातीत गाडला जातो की काय, असे मला वाटू लागले. तेथे जवळ शौचाला बसण्याचा मला धीर होईना. लोक तेथेच बसत होते. मला लोकांची चीड आली; परंतु लांब जाण्याला माझा जीवही काकू करीत होता. त्या चिखलातून कसा तरी मी थोडासा दूर गेलो. सारे धोतर चिखलाने भरुन गेले.
मी तळयावर आलो. मला नीट पोहता येत नव्हते. लहाणपणी आई मारुन-मारुन मला पोहायला पाठवी, तरीही माझे पोहणे अर्धवट राहिले होते. तळयावर शेकडो लोक आले होते. दंड वाजवीत होते. दंडांचा आवाज घुमत होता. देशावरील तरुणांची ती तालीमबाज शरीरे पाहून मला त्यांचा हेवा वाटला. मला स्वत:ची लाज वाटली. माझे दंड असे वाजतील का? माझ्या दंडांकडे मी बघू लागलो. ते वाजवण्याचा मला धीर होईना.
मी तळयात उतरलो. कंबरभर पाण्यात उभा राहिलो; परंतु पायरीवरचा माझा पाय एकदम घसरला व मी खोल पाण्यात पडलो. मी घाबरलो. डुबुक डुबुक करीत मी पुन्हा पायरी कशी तरी पकडली. प्राण जायची ती वेळ होती.
''प्राणावरच्या अनेक संकटांतून मी वाचलो आहे. एकदा बोटीत चढताना असाच मी समुद्रात पडत होतो; परंतु आश्चर्यकारक रीतीने वाचलो. एकदा लहानपणी कोठे तरी मी लग्नासाठी गेलो होतो. त्या लग्नगावी नदी होती. दुपारच्या वेळी मुले नदीत डुंबायला निघाली मीही गेलो, नदीत पाणी किती आहे, ते कोणालाच माहीत नव्हते. मुले बाजूबाजूने पाण्यात खेळत होती, परंतु मी जरा पुढे गेलो, तो एकदम मोठा खळगा. कसेतरी हात मारीत मी माघारी आलो. ते लहानपणचे अर्धवट शिकवलेले पोहणेही उपयोगी पडले.
''एकदा सुरतहून मी अमळनेरला येत होतो. मी दाराला टेकून उभा होतो. बी.बी.सी. आय.च्या गाडयांची दारे बाहेरच्या बाजूने उघडतात. दार एकदम जोराने उघडले! मी एकदम पुढे बाकावर वाकलो! त्या वेळेस मी बाहेरच फेकला जायचा व मरायचा; परंतु वाचलो. पुन्हा पुन्हा मी का वाचलो, हे मला समजत नाही. देवाने ह्या दु:खी दुनियेत मला का राखले?''
मी थांबलो. माझ्याने बोलवेना. ईश्वराचे अतर्क्य हेतू मला कोठून कळणार?
नामदेव म्हणाला, ''श्याम, तुझी व आमची गाठ पडायची होती, म्हणून देवाने तुला वाचवलं, ह्या खानदेशातील शेकडो मुलांशी प्रेमाचे, सहानुभूतीचे संबंध जोडण्यासाठी त्याने तुला वाचवलं,''
गोविंदा म्हणाला, ''गोष्टी सांगून मुलांची मनं मोहून घेण्यासाठी तू राहिला आहेस.'' रघुनाथ म्हणाला, ''ओठांवरचं अपरंपार बोलणं थोडंतरी कृतीत आणण्यात कृतार्थता आहे, हे तुला दाखवायचं होते,''