धडपडणारा श्याम 21
मी एकदम थांबलो. गोविंदाने एकदम खालील कडवे म्हटले.
खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे॥
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा ॥
तयाने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे॥
होय. प्रेमधर्म हाच खरा धर्म आहे. माझा तो नवीन मित्र गोंवदा त्या प्रेमधर्माच्याच वारकरी होता. गोविंदाजवळ प्रेमापेक्षा कर्तव्य जास्ते हाते. गोविंदा कर्तव्य ओळखी कुटुंबातील मंडळीसाठी असा कष्ट करणारा मित्र मी पाहिला नाही. शेवटी मंगल होईल, ह्या श्रध्देने तो सदैव वागत असतो. तो अजूनही तसाच धडपडत आहे. त्या वेळेस गोविंदा लहान होता; परंतु तेव्हाही त्याची कर्तव्यबुध्दी प्रखर होती. गोविंदा व मी थोडा वेळ काहीच बोललो नाही. दोघे मुक्याने चाललो होतो.
''मग श्याम, काय?'' गोविंदाने विचारले.
''माझी तयारी आहे. केव्हापासून प्रारंभ करायचा?'' मी प्रश्न केला.
''येत्या रविवारपासून,'' तो म्हणाला.
''मी एक स्वच्छ रुमाल धुऊन ठेवतो,'' मी म्हटले.
''तू माझ्या खोलीवर ये. तिथूनच आपण दोघे निघत जाऊ,'' गोविंदा म्हणाला.
''बरं,'' मी म्हटले. आम्ही माधुकरी मागायचा निश्चय करून माघारे वळलो. मी माझ्या खोलीत आलो. रात्री सखारामला मी माझा नि९चय सांगितला. त्याला वाईट वाटले.
''श्याम, मी गरीब आहे रे, नाही तर तुला मी मदत केली असती,'' तो म्हणाला.
'' तू मुळीच वाईट वाटून नको हो घेऊ.'' मी म्हटले.
गेविंदाची खोली मी पाहिली. त्या खोलीत ओल होती, वरुन गळत होते. नुकत्याच पडलेल्या पावसाच्या वेळी तेथे चांगलेच तळे साचले असावे; परंतु खोलीत उजेड होता. ''गोविंदा, खोलीत ओल आहे,'' मी म्हटले.
''मग काय करायचं?'' तो म्हणाला.
''शेजारची राख वगैरे आणून ह्यावर पसरली, तर ओल जरा कमी होईल,'' मी म्हटले.
''खोलीत मिळत नव्हती. ही मोठया मुष्किलीने मिळाली,'' तो म्हणला.
''माझ्या खोलीत गळत नाही, ओल नाही; परंतु अंधार आहे. खोलीच्या समारेच्या पडवीत गाय असते.तिच्या शेणा-मुताची घाण येतच असते,'' मी म्हटले.
''गोमूत्राची घाण आरोग्यदायकच असेल गोमय-गोमूत्र पवित्र आहे,'' गोविंदा म्हणला.
''वेडाच आहेस तू गोविंदा,'' मी म्हटले.
गोविंदा हसला. तो रविवारचा दिवस मी कधीही विसरणार नाही. मी गोविंदाकडे माझा मुकटा, ताट व एक रुमाल घेऊन गेलो. गोविंदा आधी रसोडयातून स्वत:ची सरकारी शिदोरी घेऊन आला. नंतर मी मुकटा नेसलो, खांद्यावर एक ओले फडके टाकले. हातात झोळी घेतली. खोलीतून मला बाहेर पडवेना. माझे हात-पाय थरथरत होते. डोळे भरुन आले होते.
''श्याम, असं घुटमळून कसं चालले?'' गोविंदा म्हणाला.
''गोविंदा, वाईट वाटतं,'' मी म्हटले.
''तूच त्या दिवशी म्हणालासं, की ह्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? मग आज का असं? एकदा ठरलं ते ठरलं,'' तो म्हणला.