धडपडणारा श्याम 87
त्याच्या हातातून ते पत्र मी एकदम ओढून घेतले. मित्राच्या पत्राची टिंगल झालेली मला खपली नाही.
''श्याम, पुण्याला का जाणार?''दादाने विचारले.
'हो, आजच जातो,'' मी म्हटले.
''औंधला अद्याप प्लेग आहे ना? त्याने विचारले
''आता कमी झाला असेल. पुण्याला दोन दिवस राहून पुढे जाईन. मामांकडे उतरेन, मावशीला भेटेन, रामकडे जाईन आणि नंतर औंधला जाईन म्हणतो, असं माशा मारीत इथे तरी किती दिवस बसायचं?सर्वाना ओझं. मला दे गाडीत बसवून'' मी म्हटले.
मी पुण्याला जायची तयारी केली, माझी ट्रंक घेतली; वळकटी बांधली. जेवणे झाली. सर्वाना नमस्कार केला.
''श्याम प्रकृतीला जप, पत्र पाठव,'' मामा म्हणाले.
''श्याम प्लेग अजून असला, तर राहा हो इथे,'' मामी म्हणाली.
''आता प्लेग थांबला आहे,'' मी म्हटले.
''श्याम, निघालास? तुझ्या मित्राला हा हलवा घेऊन जा,'' शेजारच्या मथुराबाई म्हणाल्या.
''श्याम, वन्संना व बाईनाही दे हो तो तिळगूळ,'' मामी म्हणाली.
दादाने खाली व्हिक्टोरिया आणली होती. सामना खाली नेण्यात आले. आम्ही दोध्ज्ञे भाऊ गाडीत बसलो. बोरीबंदरावर गाडी केली.
''ट्रंक जड आहे, वजन केलं पाहिजे. इतकं काय त्या ट्रंकेत भरलं आहेस?'' दादाने विचारले
''दादा, श्यामजवळ पुस्तकांशिवाय दुसरं काय असणार?'' मी म्हटले.
''औंधला ट्रंक ठेवून यायचं. उगीच ने - आण सामानाची. हमाल करा, वजन करा, त्यातच कितीतरी पैसे जातात,'' दादा म्हणाला.
मी काही बोललो नाही माझ्या जाण्याचा खर्च दादालाच करावा लागत होता. त्याला कितीसा पगार! कष्टमूर्ती दादाची मला कृतार्थता वाटली.
''दादा, ट्रंक मी घेईन खांद्यावर. औंधून येताना रहिमतपूर स्टेशनवर कुठे केला होता.
मी हमाल? मी काही उधळया नाही हो,'' मी म्हटले.
''श्याम, राहू दे. हमालच घेईल. कितीतरी लांब जायचं आहे!'' दाद अगदी कनवाळूपणाने म्हणाला.
ट्रंकेचे वनज झाले. काही पैसे द्यावे लागले. हमालाने सामान उचलले. आम्ही गाडीत बसण्यासाठी निघालो. वेळ होत आली होती. नीटशी जागा पाहून मी बसलो. हमाल गेला. दादा व मी तेथे उभे होतो. काय बोलणार आम्ही?
''श्याम आणखी पैसे हवेत का? त्याने विचारले
''सध्या नकोत. भाऊंनी दिले आहेत.तू तिकीट काढून दिलंच आहेस,'' मी म्हटले
''लागतील तेव्हा कळव. मी गरीब आहे; परंतु श्यामला उणीव भासू देणार नाही. माझं शिक्षण नाही झालं, तू तरी शिक. मी एक वेळ जेवेन, पण तुला होईल ती मदत करीन. पत्र पाठव,'' दादा म्हणाला.
गाडी निघाली. मी खिडकीतून बघत होतो. दादा अदृश्य झाला. थोर मनाचा ममताळू व कष्टाळू दादा निघून गेला. मी आपले नशीब, सर्वाचे आशीर्वाद व सर्वाचे प्रेम बरोबर घेऊन निघालो. आईची प्रार्थना माझ्याबरोबर येत होती, श्यामला सांभाळीत येत होती.