धडपडणारा श्याम 102
वाडयातली सारी मला हसू लागली; परंतु मला त्याचे काही वाटले नाही. माझी भूमिका ती समजू शकत नव्हती. 'नेसूचं दिलंस नाही हे नशीबच!' शेजारच्या मथूताई म्हणाल्या. मी काही बोललो नाही.
रामची आई रात्री जेवणे झाली, म्हणजे तुळशीबागेतल्या दत्ताला जात असे. तिच्याबरोबर कोणीतरी जावे लागे. बहुधा बाळू जाई. आणि मीही बहुतेक रोज रात्री जाऊ लागलो. वारावरून जेवून परभारा मी तुळशीबागेत जात असे. तेथे रामची आई आलेली असे. रामची बहीण गंगू हीही पुष्कळदा आईबरोबर येई. गंगूला घरातली सारी लाडाने 'मालण' म्हणत असत.
मी रामच्या देवळात बसे. रामची आई दत्तमंदिरात बसे. रामाची आरती झाल्यावर गर्दी नसे. मी अगदी आतल्या दरवाजाजवळ जाऊन बसत असे. रामाची सावळी मूर्ती प्राशीत बसे. त्या मूर्तीकडे कितीही पाहिले, तरी माझे समाधान होत नसे. तिकडे दत्ताच्या देवळात भजन असे. बराच वेळ रामाजवळ बसून, मग मी दत्ताच्या देवळात जात असे आणि तेथल्या भजनात मिसळत असे. ती दत्ताची मूर्तीही फार गोड होती.
आरती झाल्यावर मग बायका तेथे निरनिराळी गाणी म्हणत. रामची बहीण मालण, रामची आई, ह्याही गाणी म्हणत. रामच्या आईला शेकडो लहान-मोठी गाणी येत होती. 'नवनीतातली' कितीतरी आख्याने रामच्या आईला पाठ येत. तिची स्मरणशक्ती अपूर्व होती. तिच्या मुलांतही ही स्मरणशक्ती उतरली होती. बायकंाच्या गाण्याचा लहानपणा-पासून मला नाद. ती गाणी ऐकताना मी तन्मय होत असे. दत्ताच्या देवळात भजनाला येणारी एक गौळण होती. ही गौळणबाईही सुंदर गाणी म्हणे. एक रामदासी बाई होती. तिलाही खूप छान-छान गाणी येत असत. धरणीमातेचे एक गाणे ती म्हणे. ते केवळ अपूर्व होते.
देवळातून आम्ही घरी परत येत असू, तो साडेदहा-अकरा होत असत. दत्ताच्या देवळात मिळालेला प्रसाद मी स्वत: कधी खाल्ला नाही. मग त्या प्रसादाचे मी काय करीत असे? तो का टाकून देत असे?
नाही...नाही. तो प्रसाद मी रामला आणून देत असे. आम्ही भजनाहून परत आलो, म्हणजे रामला हाक मारीत असू. कारण वाडयाची दिंडी आतून लावलेली असे. हाक मारताच राम खाली येई व दार उघडी. दार उघडणा-या हातावर मी तो प्रसाद ठेवीत असे. एखादा खडीसाखरेचा खडा किंवा लहानसा खोब-याचा तुकडा तो काय? परंतु तो देताना मला कृतार्थता वाटे व रामला घेण्यात गोडी वाटे. प्रेमाने दिलेल्या वस्तूचे मोजमाप करायचे नसते, बाहय स्वरूप पाहायचे नसते. मला कोठे काहीही मिळाले, तरी ते रामसाठी मी घेऊन यायचा. एकदा यमूताईंनी मला अनारसे दिले होते. त्यांतले दोन मी हळूच खिशात घालून रामसाठी आणले.
''राम, आज तुला मी गंमत देणार आहे,'' मी म्हटले.
''काय बंर?'' त्याने स्मित करीत विचारले.
''ओळख तूच,'' मी म्हटले.
'' असेल रात्रीचा प्रसाद. तुझ्याजवळ दुसरं काय असणार?'' राम म्हणाला.?
''तुला ओळखता येणारच नाही,'' मी म्हटले.
''आता दे लवकर काय ते,'' राम अधीर होऊन म्हणाला.
मी त्याच्या हातात अनसरे ठेवले.