धडपडणारा श्याम 19
ॐ भवति भिक्षान्देहि
मी झ-यावर रोज आंघोळीला जाऊ लागलो. त्या बाजूला टेकडया होत्या. टेकडयांवर शौचालाही जाता येत असे. स्वच्छ पाण्याचा झरा वाहात होता. झरा कसला, तो एक ओढा होता. पाणी फार नव्हते; परंतु होते ते निर्मळ होते. एके ठिकाणी धार पडत असे, तेथे जरा बरेच, म्हणजे कंबरभर पाणी असे. मी नेहमीच एकनाथ, वामन ह्यांच्याबरोबर जात असे, असे नाही, एकदा माहीत झाल्यावर मी वाटेल तेव्हा जात असे. सर्वांबरोबर गेले, म्हणजे सर्वांबरोबर आटपावे लागे; परंतु पाण्यात डुंबत बसायला मला आवडे. शिवाय वामन, मुजावर वगैरे मुले फार नियमित होती. ते धोतर धुताना मोजून घावा घालायचे अंगावर मोजून तांब्ये ओतायचे स्वत:चे आटपले, की ते निघायचे माझे अशा कर्मठांशी कसे जमायचे? लहानपणापासून नियम मला माहीत नाही. अनियमितपणा हाच माझा नियम आहे. लहरीपणा हा माझा धर्म आहे. चार दिवस मी पहाटे आंघोळ करायचे ठरवीत असे; परंतु पाचव्या दिवशी माझे मन बंड पुकारी. हे काय यंत्रमय जीवन असे माझे मन म्हणे. माझे सारे नियम चार दिवस टिकतात. एकही माझे व्रत नाही, एकही माझा नियम नाही, माझी मला लाज वाटते; परंतु असे आहे खरे.
तुकारामहाराजांनी व्रतहीनास गाढव म्हटले आहे. माझे ह्या दुबळेपणामुळे अपरंपार नुकसान झाले आहे. केवळ स्वत:चे नुकसान झाले असते, तरी त्याचे एवढे वाईट नसते; परंतु आपल्या दुर्गुणांमुळे जगाचेही नुकसान होते. आपण नियमित न वागलो, तर दुस-यांनाही आपण फशी पाडतो. मी पुष्कळवेळा एखादया गावच्या मित्रांना, त्यांच्या आग्रहामुळे, व्याख्यानाला यायचे कबूल करतो. भिडेमुळे मी कबूल करतो. एकदम नकार माझ्या तोंडात येत नाही; परंतू पहिला होकार गेल्यावर, माझे मन बंड पुकारते. शेवटी मी पत्र पाठवतो, तार करतो. मी आजारी आहे वगैरे कळवतो. त्यांची फजिती, स्वत:ची फजिती!
आंघोळीचे वगैरे सारे नीट जमले; परंतु पोटोबाचे काय करायचे, हा प्रश्न होतो. सखाराम व मी कसेतरी दिवस ढकलीत होतो. आमच्या शेजारी एक लहानशी खाणावळ होती. रात्री एक भाकरी व थोडी भाजी त्या खाणावळल्याकडून आणण्याचे मी ठरवले. त्याबद्दल त्याला महिना दीड रुपया देण्याचे कबूल केले होते. आम्ही सकाळची एक भाकरी ठेवीत असून ती भाकरी व ही भाजी-भाकरी असे आम्ही चालविले होते; परंतु दुपारी तरी पोटभर कोठे जेवण होत होते?
वर्गात एका नवीन मुलाशी माझी ओळख झाली. तो माझ्याच आडनावाचा होता. साधारण माझ्याच वयाचा होता. त्याला बोर्डिगमध्ये शिदोरी मिळत असे. त्याने आपला धाकटा भाऊ बरोबर आणला होता. परंतु धाकटया भावाला मोफत भाजी-भाकरी मिळेना. माझ्यासारखीच त्याची स्थिती झाली. धाकटया भावाची कशी व्यवस्था लावायची, ह्या फिकीरीत तो मोठा भाऊ होता. त्या मोठया भावाचे नाव होते गोविंदा. धाकटयाचे बंडू.
एके दिवशी तो व मी फिरायला गेलो.
''श्याम मावशीला कळवलंस का?'' गोविंदाने विचारले.
''मला अद्याप धीर होत नाही आपलं दु:ख होता होई तो कुणाला कळवू नये, असं मला वाटतं. माझं इकडे ठीक चाललं आहे, असंच मी सर्वाना लिहिलं आहे,'' मी म्हटले.
''माझ्या मनात एक विचार आला आहे, तुला सांगू?'' गोविंदा म्हणाला.
''सांग,'' मी म्हटले.
''आपण माधुकरी मागू या. मला एकटयाला माधुकरी मागायला लाज वाटेल. तुलाही एकटयाला लाज वाटेल. दोघे बरोबर असलो, म्हणजे लाज वाटणार नाही,''गोविंदा म्हणाला.
मी काहीच बोललो नाही. माझा चेहरा खर्रकन उतरला. गोविंदा माझ्याकडे पाहात होता.
''श्याम, तुला वाईट का वाटलं?'' त्याने विचारले
''गोविंदा, वाईट का वाटेल? त्यात चोरी, चहाडी थोडीच आहे? मुंज करताना 'भिक्षान्देहि' चाही मंत्र देतात. श्रीमंत असो, गरीब असो, सर्वानी भिक्षा मागून शिकावं. शिकताना सारे समान, सारे दरिद्री; परंतु आता सोंग राहिलं आहे. माझी मुंज झाली, तेव्हा रोज सोडमुंज होईतो मला कोरडी भिक्षा मागायला पाठवीत. मी रडत असे. एके दिवशी वडील खूप रागावले. मी म्हटलं, 'आपण गृहस्थ, आपण का भिक्षा मागायची? 'गोविंदा, कुठे आहे ती ऐट? उपाशी राहावं, परंतू मिंधेपण नको, असं मला वाटतं. माधुकरी तरी लोकांवर भारच,'' मी म्हटले.