धडपडणारा श्याम 98
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. रामची आई वाडयात माझे वार लावीत होती! आपणच आपले वार लावावे, असे माझ्या मनात आले. दुस-या दिवशी सकाळी मी बाहेर पडलो. अप्पा बळवंत चौकातल्या कोठल्यातरी एका मोठया वाडयात मी शिरलो. ओटी वर बैठक होती. तक्के, लोड, सारे काही होते.
''कोण पाहिजे?'' तेथल्या एका रूबाबदार गृहस्थाने विचारले.
''मी एक गरीब विद्यार्थी आहे. माझा एक वार घ्याल का?'' मी विचारले.
''आधी बाहेर हो. ह्या वारक-यांनी सतावलं आहे. हो बाहेर,'' तो गृहस्थ वाघासारखा गुरगुरत अंगावर आला.
माझ्या डोळयांत गंगायमुना उभ्या राहिल्या. पुरे झाला हा प्रयोग. असे अपमान करून घेण्यापेक्षा उपाशी राहून मरणे काय वाईट? तेच पहिले व शेवटचे घर. पुन्हा कोणाकडे वार विचारायला मी गेलो नाही.
मी माघारी घरी आलो. आपल्या काही नवीन मित्रांना विचारावे, असा एक आशेचा किरण मनात आला. एका मित्राला मी विचारले. त्याने एकदम होकार दिला. मला मोक्षसुखाचा आनंद झाला. रामच्या घरचा वार व ह्या नवीन मित्राकडचा वार, हे माझे सनातन वार होते. हे वार शेवटपर्यंत बदलेले नाहीत. या दोन वारांशिवाय दुसरे माझे दोन वार होते. कधी ते वाडयात असत, कधी बाहेर कोणाकडे असत. सर्वसाधारण माझे चार वार नेहमी असत. तेवढे वार मला पुरे असत. आठवडयातील चार दिवस पोटभर जेवण मिळाले, म्हणजे मी संतुष्ट असे. माझे चार वार लागल्यावर मी रामच्या घरी सांगितले, की माझ्या वारांची सोय लागली. पुन्हा मी खोटेच सांगितले. मी जर कोणत्या एका गोष्टीसाठी पुष्कळवेळा असत्य बोललो असेन, तर ते जेवणाच्या बाबतीत. जर कोणत्या एका गोष्टीचा मला संकोच वाटत असेल, तर तो दुस-याकडे जेवण्याचा. जर कोणत्या एका गोष्टीचा मला विशेष कटाळा असेल, तर तोही जेवण्यायाच. जेवल्याशिवाय जगताच येत नाही, म्हणून जेवायचे. मी मोकळेपणाने क्वचित कोणाकडे जेवलो असेन. कोणतेही काम केल्याशिवाय जेवणे मला पाप वाटते आणि आपल्या हातून काहीही होत नाही, ह्याची मला सदैव जाणीव असते. ज्या दिवशी काही तरी काम माझ्याकडून झालेले असते, त्या दिवशी जेवताना मला आनंद होत असतो.
एकदा मी मावशीकडे बडोद्याला गेलो होतो. दोन-तीन दिवस मी आनंदाने जेवलो; परंतु मग मला स्वत:ची लाज वाटे. शेवटी वाडयातील मुले बरोबर घेऊन मी बागेत जायचा. बागेत त्यांच्याबरोबर खेळायचा. सारी मुले माझ्याबरोबर यायला उत्सुक असत. त्यांना फिरवून आणण्यात मला आनंद वाटे.
एके दिवशी माझा मामेभाऊ मला म्हणाला,''अण्णा, कशाला ती सारी पोरं घेऊन जातोस? तुला त्रास देत असतील. तू आपला एकटाच फिरायला जात जा.''
मी त्याला म्हटले, ''गोपू, अरे, ह्या मुलांना फिरायला नेतो म्हणून तर मला थोडा तरी आनंद आहे. आपण काही तरी काम करतो आहोत, असं वाटतं. घरात कोंडलेल्या मुलांना बाहेर हिंडवून आणलं, चार बि-हाडांतल्या मुलांना एकत्र, बरोबर, खेळीमेळीने लावलं, त्या मुलांच्या जीवनात थोडा आनंद ओतला, म्हणजे आता आज जेवलो तर हरकत नाही असं मला वाटतं.'' म्हणून मी कोठेही गेलो, तर निदान तेथील मुलांना चार गोष्टी सांगेन. त्यांना दोन गाणी शिकवीन. हे करण्यात माझे समाधान मी निर्मीत असतो. आपला काहीतरी उपयोग झाला, अशी मनाची समजूत मी करून घेत असतो. माझ्या निराशेत थोडी आशा मी आणतो. खाण्यापिण्यासंबंधी माझे खोटे बोलणे जगन्माउलीने क्षमावे, अशी मी सदैव प्रार्थना करीत असतो.
मी रोज मुगटा घेऊन बाहेर पडत असे. वार असो वा नसो. कधी कधी मी माझ्या विचारात इतका मग्र असे, की माझ्या हातातला मुगटा वाटेत पडून जाई! ''अहो, तुमच गाठोडं पडलं हो,'' कोणी तरी वाटेने जाणारा-येणारा मला सांगे. मी भानावर येऊन ती मुगटयाची गळली उचलून घेत असे.